पुणे - प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने टाकलेल्या छापेमारीचे सत्र आज देखील सुरूच आहे. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या मुंबईतील घरावर तसेच कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी छापेमारी केली होती. तसेच अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे एका चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि शूटिंगच्या निमित्ताने पुण्यात आहेत. येथील एका हॉटेलमध्ये आयकर विभागाकडून बुधवारपासून त्यांची चौकशी केली जात आहे, ती आज देखील सुरूच आहे.
शूटिंग निमित्त पुण्यातील हॉटेल वेस्टीनमध्ये वास्तव्य-
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने ३ मार्चला छापेमारीचे सत्र सुरू केले होते. आज तिसऱ्या दिवशी देखीलही कारवाई सुरूच आहे. कश्यप आणि तापसी हे पुण्यातील वेस्टीन हॉटेलमध्ये थांबले असल्याने त्या हॉटेलमध्ये जाऊन आयकर विभागाने या दोघांची चौकशी सुरू केली होती. बुधवार आणि गुरुवार दोन दिवस आयकर विभागाकडून त्यांची चौकशी करण्यात आली असून या दरम्यान दोघांचे लॅपटॉप आणि मोबाईल देखील आयकर विभागाने जप्त केले होते. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी देखील त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
साडेतीनशे कोटी रुपयांचा हिशोब लागेना-
आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार मीडिया प्रोडक्शन कंपनी संदर्भात बॉक्स ऑफिस वर या कंपनीला जितका फायदा झाला आहे. त्यापैकी साडेतीनशे कोटी रुपयांचा हिशोब देण्यात असमर्थता येत असल्याने आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत भारतातल्या पुणे, मुंबई दिल्ली आणि बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये 28 ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. एकंदरीतच हे छापेमारीचे आणि चौकशीचे सत्र आणखीन काही दिवस सुरू राहील, असे आयकर विभागाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. त्यानुसार आज देखील तापसी पन्नू यांची चौकशी केली जाते आहे.