पुणे - 'टीव्ही-९' वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा बुधवारी पहाटे जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये मृत्यू झाला. कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रायकर यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात ट्रीटमेंट प्रोटोकॉल मध्ये काही कमतरता होती का? याची चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पुणे महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पांडुरंग रायकर यांचा मृत्यूचे कारणही नोंदवले आहे. यामध्ये पांडुरंग रायकर यांच्यावर सुरुवातीला काेपरगाव येथे उपचार करण्यात आल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांची प्रकृती खालवल्यानंतर सोमवारी (31 ऑगस्ट) रात्री त्यांना पुण्यातील जम्बाे काेविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले हाेते. दरम्यान, ते 15 लीटर ऑक्सिजन ही मेंटन करु शकत नव्हते. त्यामुळे त्यांना आयसीयूत हलविण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करुन ऑक्सिजन लेवल 95 पर्यंत करण्यात आली.
हेही वाचा - श्रीमंत लोक लक्षणं नसतानाही आयसीयू बेड अडवतात - राजेश टोपे
दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांनी रायकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची शोधाशोध ही केली. परंतु वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यानंतर बुधवारी पहाटे साडेचार वाजता त्यांची प्रकृती खालवली. ऑक्सिजन पातळी 50 ते 55पर्यंत खाली आली. त्यानंतर त्यांना असिडाेसेस व शाॅक झाला, म्हणून त्यांना लगेच इन्टयुबेट केले गेले. त्यावेळी त्यांना जनरल अनेस्थिशिया दिला गेला. त्यावेळी इन्टयुबेशन आवश्यक हाेते व ते चांगल्याप्रकारे झाले. त्यानंतर त्यांना अम्युबॅग लावण्यात आली. त्यानंतर व्हेंटिलेटर लावण्यात आले. त्यात त्यांना वाॅल्युम कंट्राेल माेडवर घेण्यात आले. पण तरीदेखील ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने त्यांना सीपीआर देखील दिला गेला. तरी त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा - पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवरून संदीप देशपांडे यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...