पुणे - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर (वय 88) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. औंध येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले.
सहा वेळा राष्ट्रीय पुरुष एकेरी विजेतेपदाचे ठरले होते मानकरी
जागतिक बॅडमिंटन नकाशावर नंदू नाटेकर यांच्या अलौकिक खेळामुळे भारताचे नाव चमकत राहिले. 1954 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. 1956 मध्ये मलेशियातील सेलंगर स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय ठरण्याचा मान नाटेकर यांना मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकाविणारे ते पहिले भारतीय ठरले. 1961 मध्ये अमृतसर येथील राष्ट्रीय स्पर्धेत ते ट्रिपल क्राऊन विजेते ठरले. ते सहा वेळा राष्ट्रीय पुरुष एकेरी विजेतेपदाचे मानकरीही ठरले होते.
थॉमस कप स्पर्धेत 16 पैकी 12 एकेरी सामने नाटेकरांनी जिंकलेय
पुरुषांच्या थॉमस कप स्पर्धेत 16 पैकी 12 एकेरी सामनेही त्यांनी जिंकले होते. थायलंड येथील खुल्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेतही त्यांनी विजय संपादन केला. 1950-60 च्या दशकात भारतात सर्वदूर बॅडमिंटन हा खेळ घरोघरी त्यांच्या खेळाच्या शैलीने पोहोवला. हे त्यांचे सर्वांत मोठे श्रेय आहे. त्यांच्या खेळातील प्रावीण्यामुळे त्या काळात संपूर्ण देशात जणू क्रीडा संस्कृती रुजण्यास सुरुवात झाली व बॅडमिंटन बरोबरच अन्य खेळांचेही आकर्षण वाढून राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू घडले. त्यांच्या निधनाने भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील एक पर्व संपले.
पंतप्रधान मोदी, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
नंदू नाटेकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्यासह देशातील अनेक क्रीडा संघटना व खेळाडूंनीदेखील नाटेकर यांच्या निधनाबद्दल ट्विटरद्वारे तीव्र शोक व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत नंदू नाटेकर यांना भारताच्या क्रीडा विश्वात विशेष स्थान असल्याचे म्हटले आहे. ते एक उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू आणि मार्गदर्शक होते. क्रीडा विश्वातील त्यांचे योगदान नवोदित खेळाडूंना नेहमीच प्रेरणा देत राहील.
ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक उंचावला. त्यांच्या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्राला झळाळी मिळाली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, तरूणांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा मिळाली. होतकरू खेळाडूंसाठी ते आदर्श ठरले. त्यांच्या निधनामुळे क्रीडाक्षेत्रातील मार्गदर्शक असे व्यक्तिमत्त्व हरपले आहे. नाटेकर यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान महाराष्ट्राच्या चिरंतन स्मरणात राहील. महाराष्ट्र सुपुत्र, महान खेळाडू नंदू नाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत आपल्या मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करीत नाटेकरांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन दुःखदायक आहे. आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त करणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू व क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कारावर नाव कोरणारे पहिले खेळाडू. नाटेकर कुटुंबीयांच्या दुःखात सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!
ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली
ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनला देशात लोकप्रियता मिळवून दिली. भारतीय बॅडमिंटनची आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली. भारतीय खेळाडू आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवित असलेले यश नंदू नाटेकर यांनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर उभे आहे. नंदू नाटेकर यांचे निधन ही बॅडमिंटन क्षेत्राची, राज्याच्या क्रीडाविश्वाची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे स्मरण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये मिळवलेले यश हे औपचारिक प्रशिक्षणाशिवाय स्वकष्टावर मिळवलेलं यश होतं. असं असलं तरी ते अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत होते. अर्जुन पुरस्काराने त्यांचा झालेला गौरव हा भारतीय बॅडमिंटनक्षेत्राचा गौरव होता. भारतीय बॅडमिंटनचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या या महान खेळाडूला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
पुण्याच्या महापौरांनी वाहिली श्रद्धांजली
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले अर्जुन पुरस्कारने सन्मानित, भारतीय क्रीडाक्षेत्राचे नायक, महान बॅडमिंटनवीर नंदू नाटेकर यांना समस्त पुणेकरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली!
राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरियांनी वाहिली श्रद्धांजली
राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी देखील नंदू नाटेकर यांच्या निधनानंतर ट्विटरद्वारे आपला शोक व्यक्त केला. ते म्हणाले, सहा वेळा नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत विजेतेपद मिळवणारे आणि पहिले अर्जुन अवॉर्ड विजेते खेळाडू नंदू नाटेकर त्यांच्या निधनाबद्दल कळाल्याने फार दुःख झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय क्रीडाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही..! राज्य सरकारकडून परमबीर यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू