शिरुर (पुणे) - पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या महामारीचे संकट डोक्यावर असल्याने प्रशासन व्यस्त आहे. त्याचा फायदा घेऊन शिरुर तालुक्यातील शिंदोडी, श्रीगोंदा तालुक्यातील वडगाव येथे घोडनदी पात्रात वाळू माफीयांकडुन अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. त्यानुसार आज (सोमवार) सकाळी वाळू उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 14 लोखंडी यांत्रिक बोटी शिरुर महसूल विभागाने जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करून नष्ट केल्याची माहिती तहसीलदार लैला शेख यांनी दिली आहे.
हेही वाचा - देशात कोरोनामुळे उच्च शिक्षण घेणारे 82 टक्के विद्यार्थी आर्थिक अडचणीत
शिरुर तालुक्यातील शिंदोडी, श्रीगोंदा तालुक्यातील वडगाव येथील घोडनदी पात्रात गेल्या काही दिवसांपासुन अवैध वाळू उपसा सुरु होता. तहसीलदार लैला शेख यांच्या पथकासह घोडनदी पात्रात सापळा रचुन छापा टाकला असता, तिथे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पथकाने सदर ठिकाणी असणाऱ्या वाळू उपसा साहित्यासह बोटी जिलेटिंगचा स्फोट करुन नष्ट केल्या आहेत. यामध्ये वाळू उपसा करणाऱ्यांचे सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शिरुर तालुक्यात भिमा आणि घोडनदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. त्यामुळे वाळू माफीयांना चाप बसवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. महसूल प्रशासन देखील वेळोवेळी कारवाई करत आहे.