पुणे- येथील खेड तालुक्यात टोळी बनवून अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन जणांना तीन महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे. विठ्ठल बाडीया राठोड व संतोष यशवंत हजारे, अशी तडीपार केलेल्या दोघांची नावे आहेत.
हेही वाचा... गोंदियामध्ये 2 हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत
खेड तालुक्यातील गोसासी गावाच्या जवळ धामणटेक येथे विठ्ठल राठोड (वय 60, रा. धामणनटेक), संतोष हजारे (वय 38, रा. कन्हेरसर), हे दोघे जण टोळी बनवून अवैध दारू विक्री करत होते. त्यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत कलम 55 अन्वये खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातून पुणे ग्रामीण पोलीस, खेड पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अहवालावरून आज पासून 3 महिन्यांकरता हद्दपार केले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शना खाली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. आजूनही 10 गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येत असून एका गुन्हेगारावर (MPDA) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.
हेही वाचा... आईसोबत भांडण करुन घर सोडलेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार
दरम्यान, निवडणुकीच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेत बाधा आणू शकणाऱ्या खेड तालुक्यातील 40 लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचेही (crpc 144) प्रमाणे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणूक शांततेत, मोकळ्या वातावरणात पार पाडण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.