पुणे - धायरी परिसरात एका हॉटेल व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. प्रेमनाथ कृष्णा शेट्टी (वय 43), असे गळफास घेतलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. पोलिसांना याठिकाणी एक चिठ्ठी मिळाली असून लॉकडाऊनमुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे त्यात लिहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी हॉटेल उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हॉटेलमध्येच त्यांनी गळफास घेतला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.
प्रेमनाथ शेट्टी हा मॅनेजर होते. शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वीच हे रेस्टॉरंट चालवण्यासाठी घेतले होते. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले आहे.
कोरोना विषाणूशी सामना करीत असताना पुण्यात आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढले आहे. जून महिन्यात आतापर्यंत 44 जणांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. नैराश्य, कौटुंबीक वाद आणि लॉकडाऊनमुळे ओढवलेलं आर्थिक संकट ही आत्महत्येमागील कारणे आहेत.