पुणे - जालना येथील पोलिसांच्या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काही पोलीस एका व्यक्तीला काठीने अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडिओविषयी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणावर आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मारहाण होत असलेल्या व्यक्तीने जाऊन दंगा केला होता. त्यामुळे पोलिसांना ती कारवाई करावी लागली. ती कारवाई जरा जास्तच झाली. पण तरीही जालना पोलीस अधीक्षक यावर योग्य ती कारवाई करतील.
गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी आज पहिल्यांदाच पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देत पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
संबंधित बातमी वाचा - पोलिसांची भाजपच्या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दिलीप वळसे पाटील म्हणाले, गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर येथील अधिकाऱ्यांची भेट झाली होती. मात्र आज कार्यालय आणि क्राईमबाबत प्रत्यक्षात आढावा घेतला. पुण्यातील सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला झालेल्या गर्दीविषयी बोलताना ते म्हणाले, गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला अशाप्रकारची रॅली निघणे चुकीचे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
संबंधित बातमी वाचा - 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा.. भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी गवळी समाज आक्रमक
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आरक्षणासाठी मराठा समाजाने रस्त्यावर उतरावे, असे मत व्यक्त केले होते. त्यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले कोरोनाच्या काळात अशाप्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य कुणीही करू नये. सामंजस्याची भूमिका घ्यावी.