पुणे - गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे वारीचा ( Ashadhi Wari 2022 ) दैवी सोहळा वारकऱ्यांना अनुभवता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव निवळला आणि या वारीच्या सोहळ्याची सर्वच वारकऱ्यांना आस लागली होती. ही आस डोळ्यात ठेऊन या भक्ती सोहळ्याची अनुभुती आता सर्व विठूरायाच्या भाविकांना घेता येणार आहे. आषाढी वारी निमित्त मानाच्या पालख्यांचा इतिहास काय आहे? संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा नेमका इतिहास काय आहे? याचा आढावा घेणारा रिपोर्ट...
संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा असा आहे इतिहास : संतश्रेष्ठ सोपानकाका हे संत ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई यांचे बंधू. सोपानकाका आळंदी जवळच असणाऱ्या सासवड गावी समाधीस्थ झाले. ह.भ.प वै धोंडोपंत दादा महाराज अत्रे १५० वर्षापुर्वी पंढरीत वास्तव्यास असणारे थोर भवगदभक्त होते. धोंडोपंत दादा महाराज हे सदगुरु ह.भ.प वै. गंगुकाका महाराज शिरवळकर महाराज फडपरंररेचे शिष्य होते. महाराजांची 'वारी' वर अफाट निष्ठा होती. संत तुकोबारायांचा गाथा, ज्ञानेश्वरी इ.ग्रंथ त्यांना तोंडपाठ होते. अशा थोर भगवदभक्त निष्ठांवत वारकरी असणाऱ्या वै.ह.भ.प धोंडपंत दादा महाराज अत्रे यांनी संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा अंदाजे साधारण १२५ वर्षापुर्वी संत सोपानकाकांचे त्यावेळचे पुजाधिकारी ह.भ.प वै. ज्ञानेश्वर महाराज गोसावी यांच्या सहकार्याने चालु केला. संत सोपानकाकांचा पालखी सोहळा जेव्हा सुरु झाला, तेव्हा २०० वारकरी या सोहळ्यासोबत असत. सुरुवातीचे काही दिवस खांद्यावर पालखी घेऊन सोहळा चालत असे. पण कालांतराने रथ बनवला गेला. या सोहळ्यात पहिल्यापासुन धोंडोपंत दादा महाराज अत्रे, खरवडकर महाराज, देशमुख महाराज यांच्या दिंड्या आहेत.
१ लाख वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी : वै.ह.भ.प धोंडोपंत दादा महाराज यांच्या निर्वाणानंतर त्यांचेच शिष्य असणाऱ्या वै.ह.भ.प भगवान महाराज शिवणीकर यांनी हा सोहळा चालवला. तर आता भगवान महाराजांचे वंशज आमचे आदरणीय ह.भ.प माधव महाराज शिवणीकर हे ह्या सोहळ्यास चालवण्यास मोलाचे सहकार्य करतात. तर सध्या वै. ज्ञानेश्वर महाराज गोसावी यांचे नातु ह.भ.प गोपाळ महाराज गोसावी हे या पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत. हा पालखी सोहळा सासवड-मोरगांव-अकलुज-वाखरी या मार्गे पंढरीत दाखल होतो. आताच्या काळात जवळपास १ लाख वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
असा असतो श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा : हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र सासवड, जि. पुणे ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. श्रीक्षेत्र सासवड ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा पुणे आणि सोलापूर अशा दोन जिल्ह्यातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात १२ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये पुणे जिल्ह्यात ६ आणि सोलापूर जिल्ह्यात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे ११ ठिकाणी विसावे आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीचा प्रवासात निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. या पालखी सोहळयाची रिंगण २ ठिकाणी असतात. हा पालखी सोहळा श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, श्रीक्षेत्र सासवड, ता. सासवड, जिल्हा पुणे यांच्या मार्फत संचलित केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्ष पायी वारी झाली नव्हती. शासनाच्या नियमानुसार दोन वर्ष वारी सोहळा साजरा करावा लागला.यंदाच्या वर्षी निर्बंध मुक्त झाल्याने मोठ्या संख्येने वारकरी वारीत सहभागी झाले आहे.
हेही वाचा - Ashadhi Wari 2022 : पुन्हा टाळ-मृदुंगाच्या गजरात मार्गस्त झाला 'पालखी सोहळा'