पुणे - शहरातील सर्व भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मान्सून सुरू झाल्यापासून शहरात जोरदार पाऊस बरसला नव्हता. मागील काही दिवसांपासून ढग दाटून येत होते. मात्र, काही प्रमाणाताच पाऊस पडला.
काल (रविवार) संध्याकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. सकाळी देखील असेच वातावरण कायम राहिल्याने अखेर आज दुपार पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या कोरोनामुळे अनेक ठिकाणी कन्टेन्मेंट झोन्स तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा भागात वर्दळ कमी होती. मात्र काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
शहरातील जवळपास सर्वच भागात सरी कोसळल्याने सर्वत्र हवेत गारवा निर्माण झाला आहे. १५ जूनपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला होता. यानंतर मराठवड्यातील लातूर, बुलडाणा,जालना भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. आज पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या सरी कोसळल्या आहेत. तसेच पुण्यातील मुख्य शहर आणि काही प्रमाणात जिल्ह्याच्या उर्वरित भागात जोरदार सरी बरसायला सुरुवात झाली आहे.