पुणे - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या १५ तासात १३५ मिली मीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. सध्या धरणात ६०.७४ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
शुक्रवारपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परिसरातील नदी, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. १ जूनपासून साधारण १५११ मिली मीटर एवढा पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात पाणी साठा कमी होता. परंतु गेल्या २४ तासात झालेल्या मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे.
धरणातील पाणीसाठा वाढल्याने पिंपरी-चिंचवडकरांवरील पाणी कपातीचे मोठे संकट दूर झाले आहे. नागरिकांमध्ये यामुळे समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान सध्या शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत आहे. अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. एकीकडे पावसाअभावी मराठवाड्यात शेतकऱ्यांची पिके करपत आहेत तर मावळ परिसरात मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.