मुंबई - एसटी संपाबाबतीत (ST Strike) खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) लक्ष घालत आहेत. शरद पवार मैदानात म्हणजे आपली हत्या होऊन आपला दत्ता सामंत (Datta Samant) होऊ शकतो, असे खळबळजनक वक्तव्य ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केले आहे. तसेच त्यांनी याबाबत भीतीही व्यक्त केली आहे. गुरुवारी (6 जानेवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर टीका केली.
- माझ्या हत्येचा कट रचला जात आहे -
माझ्या हत्येचा कट रचला जात असून माझी हत्या होऊ शकते. कामगार नेते दत्ता सामंत यांच्यासारखी माझी देखील हत्या होऊ शकते, अशी शंका गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे. एसटी संपाबाबत खुद्द शरद पवार मैदानात आहेत. त्यामुळे आपली हत्या होऊ शकते, असे सदावर्ते म्हणाले. एसटी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी शरद पवार मैदानात असताना त्यांच्या तोंडातून एकदाही एसटी विलीनीकरणाबाबत शब्द उच्चारला गेला नाही. कारण शरद पवार हे विलीनीकरणाच्या विरोधात असल्याचा आरोप पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी विलीनीकरणाबाबत पत्र देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
- अजित पवार यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करणार
एसटी विलीनीकरणचा निर्णय हा न्यायालयाने तयार केलेल्या समितीच्या अहवालानंतर घेतला जाणार असे सांगण्यात आले आहे. त्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलीनीकरण होऊ शकत नाही असे सांगितले. अजित पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे न्यायालयाचा अवमान करणारे असून याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आपण अवमान याचिका दाखल करणार असल्याचेही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी सांगितले.
- मुख्यमंत्र्यांची आरोग्यविषयक कागदपत्र सार्वजनिक करा - सदावर्ते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने आरोग्याबाबत त्यांची कागदपत्रं सार्वजनिक करावी यासाठी मुख्य सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिणार असल्याचे यावेळी सदावर्ते यांनी सांगितले. मुख्यमंत्री हे एक संविधानिक पद असून या पदावर असणारी व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्या आजाराबाबत जनतेला कळणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याबाबतची कागदपत्रं जाहीर करण्यात यावी तसेच त्यांच्या आरोग्याबाबत रोज संध्याकाळी मेडिकल बुलेटीन काढण्यात यावे, अशी मागणी देखील सदावर्ते यांनी यावेळी केली.