पुणे - केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आज अखेर 177 शेतकरी आंदोलक शहीद झाले. या शहिद शेतकऱ्यांना महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकरी बचाव कृतीसमितीच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे. तसेच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकदिवसीय सभेचे आयोजन कले आहे.
भाजपा व्यतिरिक्त सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि विविध संस्था, संघटनांचा सहभाग-
बालगंधर्व चौक येथील झाशीची राणी पुतळ्याजवळ या सभेचे आयोजन करण्यात आले. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील भाजपा व्यतिरिक्त सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि विविध संस्था, संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. यांनी मिळून सुरू केलेल्या शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात अनेक आंदोलने करण्यात आली.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाठिंबा सभेचे आयोजन-
महात्मा गांधी यांनी ज्या मूल्यांसाठी आपलं जीवन अर्पण केलं. आज तीच मूल्य राखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात 177 शेतकरी आंदोलक शहिद झाले आहेत. दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलक आहे ते एकटे नसून देशभरातील शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. या आंदोलकांना पाठिंबा आणि बळ मिळावं म्हणून आज सर्व राजकीय पक्ष आणि विविध संस्था, संघटनांच्यावतीने पाठिंबा सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती किसान बचाव कृती समितीचे समन्वयक नितीन पवार यांनी दिली.