पुणे - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी प्रति हेक्टर ८ हजार तर फळबागांसह बारमाही पिकांसाठी 18 हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, फळ भागातील द्राक्ष पिकासाठी एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च होतो. त्यामुळे सरकारची ही मदत तुटपुंजी असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारची ही मदत आम्ही पुन्हा सरकारलाच मनीऑर्डरने पाठवणार असल्याची उद्विग्न भावना द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा... 'येणारं सरकार तीन पक्षांचं मिळून असेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल'
अवकाळी पावसामुळे बारामती तालुक्यातील निरावागज येथील भानुदास डोंबाळे या शेतकऱ्याच्या दीड एकर द्राक्ष बागेची पूर्ण नासाडी झाली आहे. झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून योग्य मदत मिळेल, अशी आशा शेतकरी धरून बसला होता. मात्र, शेतकऱ्याला फळपिकासाठी प्रति एकर लाख ते दीड लाख रुपये खर्च केलेला असतानाही, प्रत्यक्षात प्रति हेक्टर केवळ 18 हजार रुपये मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याने उद्विग्न होत आपल्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा... नाशिकमध्ये ऑक्टोबर महिन्यात 190 रुग्णांना डेंग्यूची लागण, 11 महिन्यात चार संशयित रुग्णांचा मृत्यू
डोंबाळे यांना आपल्या दीड एकर द्राक्ष बागेतून प्रति वर्षी दहा ते अकरा लाख रुपये मिळतात. मात्र, अवकाळी पावसाने त्यांच्या द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शून्य उत्पादन होणार आहे. मात्र, सरकारकडून मिळणारी मदत देखील तुटपुंजी असल्याने त्यांनी आपली द्राक्ष बाग तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारची अपुऱ्या मदतीची रक्कम सरकारलाच परत पाठवणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा... सावरकरांचा द्वेष करणाऱ्यांसोबत जाणाऱ्यांनी विचार करावा; भाजपचा शिवसेनेला टोला
मदत व निकष....
1. जिरायती शेतीवरील पिकासाठी प्रतिहेक्टरी आठ हजार रुपये
2. बागायती, बारमाही फळबागासाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये
3. ही मदत फक्त दोन हेक्टरपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाच मिळणार आहे.