पुणे - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी पीडित मुलीचा आईसोबत वाद झाला होता आणि त्यामुळे रागाच्या भरात ती घर सोडून बाहेर पडली होती. यावेळी तिला ओळखत असलेल्या एका तरुणाने तुला गावी सोडतो, असे म्हणून रिक्षातून आपल्याबरोबर नेले आणि एका इमारतीच्या फ्लॉटवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या मुलीने आरोपीच्या तावडीतून आपली सुटका केली. मात्र त्यानंतर आणखी एका व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला. नंतर या व्यक्तीने पीडितेला बोपदेव गावात आणले. या ठिकाणी आरोपी आणि त्याच्या दोन नातेवाईकांनी देखील या पीडितेवर अत्याचार केला.
या मुलीने आरोपींच्या तावडीतून सुटका करत, एका नागरिकांच्या मदतीने हडपसर पोलीस स्टेशन गाठले, व झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पीडित मुलगी ही मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातून पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडिलांसह पुण्यामध्ये आई आहे. तिचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.