पुणे - राज्यात विधान परिषदेच्या मोजक्या जागेंसाठी होऊ घातलेल्या निवडणूकीकरिता भारतीय जनता पक्षाने आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गजांना डावलून नवख्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिल्याचे बोलले जात आहे. त्यातच पक्षाकडून आश्वासन मिळालेले, तिकिटाची सर्वाधिक आशा असणारे, असे अनेक नेते उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले आहेत. यापैकी एक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड विधानसभेच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या देखील आहेत. त्यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याची आपली नाराजी स्पष्ट शब्दात ईटीव्ही भारतकडे व्यक्त केली आहे. 'विधानपरिषदेवर माझा फर्स्ट आणि राईट क्लेम होता. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने मी निराश झाले आहे' असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... अनेक दिग्गजांना मागे टाकत भाजपच्या 'या' नेत्याने पटकावली विधान परिषदेची उमेदवारी
....त्यावेळेस पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले होते
'विधानसभा निवडणुकीवेळी कोथरूड मतदारसंघ आपण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडला होता. मला तेव्हा पक्षाने तिकीट नाकारले नव्हते असे नाही, किंवा माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नव्हते. मी पूर्णपणे निवडून येण्याची शक्यता असताना देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ आपण सोडला होता. त्यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले होते. आपल्याला विधानपरिषदेवर घेऊ, असे ते वारंवार जनतेमध्ये सांगत होते. भाषणा दरम्यान सांगत होते. पक्षाने मला नाही तर जनतेला आश्वासन दिलेले होते. मेधा कुलकर्णी यांना आम्ही 'आमदार' नाही, अशा अवस्थेत फार काळ ठेवणार नाही, असे जाहीर आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे विधान परिषदेवर मला घेतले जाईल, याची मला संपूर्ण खात्री होती. मी अपेक्षा करत होते. मात्र, माझी निराशा झाली आहे. इतर कोणाला विधान परिषदेवर घेतले त्याबाबत मला काही बोलायचे नाही. मात्र, मला विधानपरिषद नाकारल्यामुळे मी निराश आहे' असे मेधा कुलकर्णी यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना म्हटले आहे. तसेच 'आपली ही निराशा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली आहे. 'माझे काय चुकले' असा संदेश आपण त्यांना केलेला आहे. ज्याचे उत्तर आपल्याला मिळालेले नाही' असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा... विधानपरिषद निवडणूक : भाजपचा खडसे, पंकजा मुंडे, बावनकुळेंना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी
विधान परिषदेसाठी भाजपकडून चार नवीन चेहेरे देण्यात आले आहेत. भाजपची ही यादी पाहिल्यानंतर पक्षांतर्गत इच्छुकांना धक्का बसला आहे. अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले असून भाजपमधील अनेक दिग्गज देखील बाजूला सारले गेले आहेत. याच नाराज नेत्यांमध्ये पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या देखील असल्याने त्यांनी 'आपण निराश झालो असल्याची' प्रतिक्रीया त्यांनी ईटीव्ही भारतला दिली.