पुणे - वंचित विशेष चिमुकल्यांना मामाच्या गावाची मजा अनुभविता यावी, याकरीता मामाच्या गावची सफर या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. मात्र, याहिवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ३५० वंचित-विशेष मुलांना येथे येऊन या सफरीचा आनंद घेता येणे शक्य नसल्याने त्यांना सर्व प्रकारचे धान्य आणि तब्बल २० प्रकारचा खाऊ, फळे त्यांना त्यांच्या संस्थेत मामांकडून पाठविण्यात आले.
सेवा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे ७ संस्थांमधील मुलांना मदत
शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सेवा मित्रमंडळ गणपती मंदिरात हे सर्व साहित्य ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुपूर्द करण्यात आले. सुषमा सावंत सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर तसेच विशाल घोडके स. कामगार आयुक्त यांच्या हस्ते या संस्थांना देण्यात आले. यावेळी मंडळाचे शिरीष मोहिते, आनंद सराफ, आदी उपस्थित होते. आपले घर, लू ब्रेल अंध-अपंग कल्याणकारी संस्था, एकलव्य न्यास, संतुलन पाषाण, ममता फाऊंडेशन, माहेर, बचपण फोर वर्ल्ड अशा या सात संस्थांमधील मुलांना मदत करण्यात आली आहे.
उपक्रमाचे यंदा २२ वे वर्ष
शिरीष मोहिते म्हणाले, दरवर्षी हास्य विनोद करणारा चार्ली, विदूषक, ऊंट, घोडे आणि बॅन्ड-बाजाच्या स्वरात मामाच्या गावी चिमुकल्या भाचे मंडळांचे जंगी स्वागत करण्यात येते. मात्र याहिवर्षी कोरोनाच्या संकटामुळे वंचित मुलांना येथे येणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना खाऊ मध्ये ७५० बेसन लाडू, 100 किलो आमरस, 100 नग कलिंगड व टरबूज, केक, क्रीम रोल, टोस्ट, कॅडबरी चॉकलेट, भेळ, तसेच सहा वेगळ्या प्रकारची बिस्किटे, कोकम सरबत, ७ वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य, साखर, पोहे, मसाले मास्क, वाफ घेण्यासाठी भांडे इत्यादी आम्ही त्यांना खाऊ व साहित्य पाठवित आहोत. मागच्याही वर्षी कोरोनाने आम्ही त्यांना अशाच पद्धतीने मदत केली होती आणि याही वर्षी अशाच पद्धतीने मदत करण्यात येत आहे.
दरवर्षी या मुलांसाठी विविध स्पर्धा, सहली, ऑर्केस्ट्रा, पोलीस स्टेशनची सफर, अग्निशमन दलाची प्रात्यक्षिके अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन येत होते. यंदा केवळ खाऊ व आवश्यक धान्य पाठविण्यात आले.
हेही वाचा - दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम