पुणे - येथील टांगेवाला कॉलनीतील पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना संतप्त नागरिकांनी हुसकावून लावले आहे. पालकमंत्र्यांच्या निषेध असो, निवडणूक आली म्हणून भेटायला आले, मदत दिली नाही, असे म्हणून टांगेवाला कॉलनीच्या नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच खाली बसून घोषणाबाजी केली.
नागरिकांचा रोष बघून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 10 मिनिटात तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून दुसऱ्या रस्त्याने पाटील यांना घेऊन गेले.
बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील कात्रज, सहकारनगर, दांडेकर वस्ती, आंबील ओढा, पर्वती पायथा येथील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. बहुतांश घरातील साहित्य वाहून गेले आणि मागे उरला होता तो फक्त चिखल. अशा कठीण प्रसंगी महापालिका प्रशासनाने कुठलीही मदत केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आज दुपारी भेटण्यासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे पालकमंत्र्यांचेही संतप्त जमावासमोर काही चालले नाही आणि त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.