मुंबई - पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. कोव्हिशील्ड या लशीची निर्मिती या इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (21 जानेवारी) दुपारी एक वाजता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश मिळालं. मात्र या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आग विझल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली व त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
आगीत पाच जणांचा मृत्यू झाला-
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. तिथे विजेचं आणि वेल्डिंगचं काम सुरु होतं, त्यादरम्यान ही आग लागली असावी.”
“सुरुवातीला आम्हाला माहिती मिळाली होती की, इमारतीत चार जण अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की, या आगीत एक मजला जळून खाक झाला आहे, तसेच यावेळी पाच जण दगावले आहेत. मृतांमध्ये इमारतीच्या बांधकामावर काम करणारे कंत्राटी कामगार असू शकतात.”, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
कोरोनावरील लस सुरक्षित
“सर्व लसी तळमजल्यावर ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे लसींचं काही नुकसान झालेलं नाही. दरम्यान या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर वित्तहानी किती झाली आहे, याबाबत अद्याप काहिही सांगता येणार नाही", अशी माहिती देखील मोहोळ यांनी दिली.
वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली - आरोग्यमंत्री राजेश टोपे
सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागली होती. तसेच मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. इमारतीचे काम सुरू होते. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा- कोरोना लस निर्माण होणाऱ्या ठीकाणी आगीचा प्रादुर्भाव नाही, मंत्र्यांची माहिती