पुणे - पुण्याच्या मांजरी भागातील सीरम इंस्टिट्यूटमध्ये लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशामन दलाकडून कुलींगचे काम सुरू आहे. या आगीत शेवटच्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांच्या मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. आज दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशामन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझल्यानंतर आग लागलेल्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर पुन्हा एकदा आग लागली होती. पण ती तात्काळ आटोक्यात आणण्यात आली आहे. दरम्यान, पुणे गुन्हे शाखा याबाबतचा समांतर तपास करणार आहे.
- मृतांच्या नातेवाईकांना सीरमकडून प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाखांची मदत सीरम इन्स्टिट्यूटकडून जाहीर करण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलिकडे जाऊन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखांची मदत जाहीर करत आहोत, असं सीरमचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावला यांनी म्हटले आहे.
- आग लागलेल्या इमारतीत कोव्हिशिल्डचे उत्पादन नाही
जिथे कोरोनाची लस बनवण्याचे काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचे काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
- मुख्यमंत्री ठाकरे उद्या देणार सीरम इन्स्टिट्यूटला भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी बोलणे झाले आहे. मुख्यमंत्री उद्या (22 जानेवारी) दुपारी पुणे येथे सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
- वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली असल्याची शक्यता
सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागली होती. तसेच मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे.इमारतीचे काम सुरू होते. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली असल्याची शक्यता राजेश टोपे यांनी वर्तवली आहे.
- आगीत मृत्यू झालेल्यांची नावे
सीरम इन्स्टिट्यूटमधल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे सर्व मृतदेह नोबेल हॉस्पिटलमध्ये नेले आहेत. यातील दोघेजण हे मूळचे उत्तरप्रदेशचे असून, एकजण बिहार आणि दोघेजण हे पुण्यातील होते.
1) रामा शंकर हारिजण ( रा. उत्तरप्रदेश)
2) बिपीन सरोजी (रा. उत्तरप्रदेश)
3) सुशीलकुमार पांड्ये ( रा. बिहार)
4) महेंद्र इंगळे (रा. पुणे)
5) प्रतिक पास्त (रा. पुणे)
- शेवटच्या मजल्यावर आढळले मृतदेह
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. सहा मजली इमारतीत ही आग लागली. ही निर्माणाधीन इमारत आहे. सुरुवातीला आतमध्ये चार जण अडकले अशी माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करून या चारही जणांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, आग आटोक्यात आल्यानंतर शेवटच्या मजल्यावर जवान पोहचले असता तो मजला जळून खाक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिथेच पाच मृतदेह आढळले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते सीरमचे कर्मचारी आहेत की बांधकाम कर्मचारी ते आताच सांगता येणार नाही. मृतदेह ताब्यात घेऊन पुढे पाठवण्यात आले आहेत, असे मोहोळ यांनी सांगितले. इमारतीचं बांधकाम चालू होते. वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडून आग लागल्याचे सांगितले जात आहे मात्र, अद्याप नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, असेही मोहोळ म्हणाले.
- तपास यंत्रणा केंद्रीय गृह मंत्रालयाला देणार अहवाल
कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे नाव हे आता जगभर झाले आहे. त्यामुळे यात घातपाताच्या शक्यतेबाबत तपास यंत्रणा तपास करतील आणि या आगीसंदर्भातला सविस्तर अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर करतील.
- सीरममध्ये आग लागली की लावली गेली - अॅड. प्रकाश आंबेडकर
सीरम इन्स्टिट्यूटमधील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीबाबत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संशय व्यक्त केला आहे. सीरम इंस्टिट्यूटमध्ये आग लागली आहे की लावली गेली आहे हे बघायला हवे, अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली आहे.
- सीरममध्ये तयार झाली कोविशिल्ड लस!
लस निर्मितीमध्ये पुण्यातील सीरम कंपनी जगभरात आघाडीवर आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सीरम कंपनीने लस निर्मितीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका फार्मा कंपनीसोबत सहकार्य केले. त्यानुसार लसीवर संयुक्तपणे संशोधन करण्यात आले. सोबतच सीरम कंपनीत मोठ्या प्रमाणात लस निर्मिती करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कोरोना लसीचे उत्पादन सीरमच्या फॅसिलिटीतच करण्यात येत आहे. कंपनीने लसीला परवाना मिळण्यासाधीच कोट्यवधी डोस तयार करून ठेवले होते. ही लस शीतगृहात ठेवाली लागते. त्यामुळे त्यासाठी खर्च येतो. आता लसीचा पुरवठा करताना कोल्ड स्टोरेजमधूनच लस देशातील विविध शहरात पोहचवण्यात येत आहे.
हेही वाचा - सिरम इन्स्टिट्यूट मधील आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू- महापौर
हेही वाचा - सीरममध्ये तयार झाली कोविशिल्ड लस!
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सिरमच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची करणार पाहणी