पुणे - पुणे पोलिसांनी एका मोठ्या दरोडेखोर टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आहोत, असे धमकावून पुण्यात आलेल्या सोन्याच्या व्यापाऱ्याकडून स्वारगेट चौकातून 25 लाख रुपये रोकड लुटणाऱ्या 5 चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. विपिन द्वारका प्रसाद तिवारी, कपिल वीर सिंग यादव, शैलेंद्र कुमार रामसेवक, भूपेंद्र शामलाल रॉय आणि मोहम्मद शरीफ मोहम्मद सर्वर शेख, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
काय आहे नेमक प्रकरण?
7 मार्च रोजी सोनी नावाचे व्यापारी हे सोने खरेदी करण्यासाठी नांदेड येथून खासगी बसने स्वारगेट चौकात आले होते. त्याचवेळी सोनी यांच्या जवळ येत चोरट्याने आम्ही अँटिकरप्शनचे पोलीस अधिकारी आहोत, तुमची तपासणी करायची आहे, असे सांगत सोनी यांना गाडीत बसवत त्यांच्याजवळील 17 लाख 50 हजाराची रक्कम पळवली होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर या आरोपींना स्वारगेट पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. चोरट्याकडून 17 लाख 50 हजाराच्या रोकड रकमेसह एक गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. प्रकरणात पोलिसांनी 25 लाखांची रोख रक्कम, एक पिस्टल जप्त केले असून, न्यायालयाने या आरोपींना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - Aurangabad Crime : बनावट पोलिस उपधीक्षकाची दहशत, जीन्सी पोलिसात गुन्हा दाखल