पुणे - अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगांवकर ‘माई’ या अल्बमद्वारे लवकरच संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. यात महालक्ष्मी अय्यर (Mahalaxmi Iyer), शंकर महादेवन (Shankar Mahadevan), सुरेश वाडकर (Suresh Wadkar) या दिग्गज कलाकारांबरोबरच गुरू पं.रघुनंदन पणशीकर आणि आई सुवर्णा माटेगांवकर यांच्या रचना केतकीने संगीतबद्ध केल्या आहेत.
केतकी माटेगांवकरच्या ‘माई’ हा अल्बममध्ये दोन भागांत एकूण ९ गाणी असतील. केतकीची पणजी माई यांच्या रचना यामध्ये संगीतबद्ध करण्यात आल्या असून धार्मिक, सकारात्मक, भक्तीमय भाव हे याचे वैशिष्ट्य आहे. वर नमूद गायक – गायिकांबरोबरच मीनल माटेगांवकर आणि अक्षय माटेगांवकर यांनी देखील या अल्बममध्ये गाणी गायली आहेत. नुकतेच पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केतकी माटेगांवकर हिने या विषयीची अधिकृत घोषणा केली. केतकीची आई व प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगांवकर, वडील पराग माटेगांवकर यावेळी उपस्थित होते.
संगीत हाच माझा मार्ग
संगीतकार म्हणून केलेल्या पदार्पणाविषयी अधिक माहिती देताना केतकी म्हणाली, “मला संगीताच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडते. माझ्यासाठी हा योग्य मार्ग आहे, असे नेहमी वाटत आले. आपल्याकडे फारशा महिला संगीतकार न झाल्याने एखाद्या गाण्याकडे, चालीकडे पाहण्याचा एका स्त्री संगीतकाराचा एक वेगळा दृष्टीकोन या निमित्ताने श्रोत्यांना अनुभवता येईल.”
हेही वाचा - #गणेशोत्सव 2021 : अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकरसोबत गप्पांची सुरेल मैफिल
महिलांनी संगीत क्षेत्राकडे वळावे
संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, मीना खडीकर, उषा खन्ना आणि अलीकडच्या काळात वैशाली सामंत या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला संगीतकार डोळ्यासमोर येतात. हे चित्र बदलावं आणि संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी संगीत दिग्दर्शन क्षेत्राकडे वळावे, असे मला मनापासून वाटते. महिला संगीतकारांच्या चांगल्या रचना देखील रसिकांच्या पसंतीस उतरतील अशी अपेक्षा केतकीने व्यक्त केली.
संगीतकार म्हणून जबाबदारी वाढली
मी संगीतबद्ध केलेल्या पहिल्याच अल्बममध्ये महालक्ष्मी अय्यर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, माझे गुरु पं रघुनंदन पणशीकर आणि आई सुवर्णा माटेगांवकर हे प्रतिथयश कलाकार गायले आहेत. एखाद्या तरुण महिला संगीतकाराला तिच्या संगीतकार म्हणून होत असलेल्या पहिल्याच प्रयत्नावर इतक्या लोकप्रिय आणि जागतिक कीर्तीच्या गायकांनी विश्वास टाकला हे माझ्यासाठी खूप विशेष आहे असे केतकीने यावेळी सांगितले.माझ्या अभिनय व गायन कलेचे कौतुक रसिकांनी नेहमीच केले. महाराष्ट्राची कन्या म्हणून मला सिने व संगीत रसिकांनी खूप प्रेम दिले. आता संगीतकार म्हणून माझी जबाबदारी वाढली आहे, याची जाणीव आहे. अपेक्षांचे दडपण असले तरी ही जबाबदारी पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करेल, असा विश्वास केतकी माटेगांवकर हिने व्यक्त केला.
येथे ऐकता येतील केतकीची गाणी
लवकरच केतकी माटेगांवकर या अधिकृत यु ट्यूब चॅनल बरोबरच स्पॉटीफाय, मॅजिक मिस्ट व इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मद्वारे ही गाणी रसिकांना अनुभविता येणार आहेत. चित्रपट सोडून इतर प्रकारच्या संगीताला मिळत असलेली रसिकांची पसंती पाहता नजीकच्या भविष्यात अनेक प्रतिथयश कलाकारांची संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचेही केतकीने सांगितले.
हेही वाचा - VIRAL VIDEO: जूनियर NTR ने केला आलियाचा पर्दाफाश, नेहमी रणवीरसोबत व्हडिओ कॉलवर..