पुणे - नऊ मार्च 2020 दुबईवरून परतलेल्या एक दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली आणि राज्यातील पहिला रुग्ण पुण्यात सापडल्याची बातमी सर्वत्र पसरली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात पुणे शहरात मोठ्या संख्येने म्हणजेच 2 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाच्या लागण झाली. यात आत्तापर्यंत 1 लाख 96 हजाराहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. असे असले तरी एका वर्षभरानंतरही पुण्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे.
आत्ता पर्यंत शहरात 209083 पॉझिटीव्ह रुग्ण -
मागच्या वर्षी मार्चमध्ये शहरात कोरोनाचा पाहिला रुग्ण सापडला त्यानंतर शहरात झपाट्याने रुग्ण संख्यावाढत गेली आणि शहरात 100 हुन अधिक कॅटेन्मेंट झोन तयार झाले. एकेकाळी दिवसाला 2 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण पुणे शहरात सापडत होते. आजमितीला शहरात आत्ता पर्यंत 2,09,083 पॉझिटीव्ह रुग्ण झाले आहे.
आत्तापर्यंत 4897 कोरोना रुग्णांचे मृत्यू -
शहरात आत्तापर्यंत वर्षभरात 4897 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहे. वर्षभरात फक्त 1 दिवस सोडले तर दरोरोज 3 ते 5 कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहे. पुणे शहरात आत्ता काहीसा कोरोनाचे मृत्यू दर कमी झाला, असला तरी आजमितीला शहरात 1 ते 2 कोरोना रुग्णाचे मृत्यू होत आहे.
आज पर्यंत 196751 रुग्णांना डिस्चार्ज -
पुणे शहरात कोरोनाच्या सुरवातीपासूनच रुग्ण वाढत असले तरी मोठ्याप्रमाणात कोरोना रुग्ण हे बरे होत आहे. आज पर्यंत 1,96,751 रुग्ण बरे होऊन या रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोना रुग्ण बरे होत असले तरी शहरात कोरोना रुग्ण कमी होण्याचे काही नाव घेत नाही आहे. लॉकडाऊननंतर हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत असला तरी शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे.
आत्ता परत कोरोना रुग्णसंख्येत वाढ -
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉकमध्ये हळूहळू सर्व व्यवहार, धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली. शहरात बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली.पोलीस,महापालिका प्रशासन मास्कची कारवाई करत असली तरी लोक सर्रासपणे बाजारात विना मास्क फिरत आहे. लग्नाचा सिझन आल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करू लागले आहे. परिणामी जी कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली होती, ती पुन्हा वाढत आहे. शहरात पुन्हा 62 कंटेन्मेंट झोन तयार झाले असून रुग्ण संख्या देखील मोठ्या संख्येने वाढत आहे.
शहरातील या भागात वाढत आहे रुग्णसंख्या -
पुणे शहरातील नगर रस्ता सिंहगड रोड आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच बरोबर वारजे नरवीर तानाजी मालुसरे रस्ता औंध बाणेर कोथरूड आणि बावधन याही परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
शहरात पून्हा चाचण्यांचे प्रमाण वाढविले -
पुणे शहरातील नगर रस्ता बिबवेवाडी सिंहगड रोड आणि वारजे तसेच कोथरूड अश्या या क्षेत्रीय कार्यालयाचे हद्दीत सध्या रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणांची चाचणी केंद्रे चाचण्यांचे प्रमाण आणि केंद्रावरील मनुष्यबळ वाढविण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ससून सह पालिकेच्या रुग्णालयातील 1163 खाटा उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्याला आज एक वर्षा झाले आहे. वर्षभरात नंतरही शहरात कोरोना रुग्णसंख्या काही कमी होईना अजून ही शहरात कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. नागरिकांनी जर नियमांचे पालन नाही केले तर पुन्हा लॉकडाऊन सारखी परिस्थिती भविष्यात पाहता येणार आहे.