पुणे- पुण्यात 31 डिसेंबरला एल्गार परिषद आयोजित करण्यासाठी मागितलेली परवानगी पुणे पोलिसांनी नाकारली. पुणे पोलिसांनी परवानगी नाकारताना कोविडचे कारण दिले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ब्राह्मण महासंघ ज्याप्रकारे विरोध करत आहे. ते पाहता कोविडमुळे परवानगी नाकारली की ब्राह्मण महासंघाच्या विरोधामुळे नाकारली, असा प्रश्न परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घेणारे माजी न्यायमुर्ती बी.जी कोळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
न्यायमुर्ती बी जी कोळसे-पाटील यांचा पुढाकार-
31 डिसेंबरला पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच येथे एल्गार परिषद आयोजित करण्यासाठी माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे-पाटील यांनी पुढाकार घेतला होता. मात्र पोलिसांनी या आयोजनाला परवानगी नाकारली. त्यानंतर, ईटीव्ही भारतने बी.जी कोळसे-पाटील यांची भूमिका जाणून घेतली.
राजकारण्यांनी जाती-पातीच्या भूमिकेतून बाहेर यावे-
अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण या मुद्द्यांवर राजकारण व्हावे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राजकारण्यांनी जाती-पातीच्या भूमिकेतून बाहेर येऊन काम करावे, यासाठी आम्ही परिषद आयोजित करतो, असे कोळसे-पाटील म्हणाले.
संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी दंगल भडकवली-
कोरेगाव भिमाच्या घटनेला दोनशे वर्षे पूर्ण होत असल्याने शौर्य अभिवादन दिनानिमित्त आमचे विचार देशभर पोहचविण्यासाठी 31 डिसेंबर 2017 ला एल्गार परिषद आयोजित केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाला. मात्र संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी दंगल भडकवली असताना एल्गार परिषदेचा संबंध जोडत कारवाई झाली, असा आरोप कोळसे-पाटील यांनी केला.
हे सरकार सुद्धा मनुवादी-
भिडे आणि एकबोटे यांना वाचवण्यासाठी तसेच देशभरातील सरकारचे जे वैचारिक विरोधक आहेत. ज्यांना आम्ही अजिबात ओळखत नाही. अशा लोकांचा एल्गार परिषदेशी संबंध जोडण्यात आला आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे पाटील म्हणाले. गेले दोन वर्ष देखील एल्गार परिषद झाली. मात्र ती बंद हॉलमध्ये घेतली होती. यावर्षी आम्ही गणेश कला क्रीडा मंच येथे परिषद घेण्याचे ठरवलं होतं. मात्र कोविडचे कारण देत आम्हाला परवानगी नाकारली आहे. सध्याचे राज्य सरकार केवळ नावाला पुरोगामी आहे. हे सरकार सुद्धा मनुवादी आहे, अशी टिका बी.जी कोळसे पाटील यांनी केली.
नाहीतर न्यायालयात याचिका-
बी.जी कोळसे पाटील म्हणाले, परवाणगी बाबत आम्ही सरकारला विनंती करत आहोत. नाहीतर न्यायालयात याचिका टाकणार आहोत. आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. आमच्या मुद्द्यावर आम्हाला परिषद भरायची आहे, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा- खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्लीतून अटक, काय आहे पुणे कनेक्शन?