पुणे - पुण्यात गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या सुरक्षांचा (School Security) प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळांमध्ये जाऊन अत्याचार करणे, मुलींची छेडछाड करणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Suraj Mandhare) हे आता ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. यासाठी त्यांनी टास्क फोर्सची (Task Force) निर्मिती केली आहे. तसेच या टास्क फोर्सच्या माध्यमातून शाळांना देखील काही सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेत ये-जा करणाऱ्या लोकांची नोंद, शाळेतील गेट बंद आहे की नाही, सीसीटीव्ही तसेच कर्मचारी वर्गांची चारित्र पडताळणी करणे अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटना : कोरोनाच्या 2 वर्षानंतर शाळा आणि महाविद्यालय सुरू झाली आहेत. पण, शहरातील शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसातच शहरात शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत एका 11 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतच अतिप्रसंग झाल्यानंतर आता शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. तसेच शिक्षण आयुक्त सूरज मांढरे ऍक्शन मोडवर आले आहेत.
टास्क फोर्सची स्थापना : आता शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या आठ टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. शिक्षण विभागाला शिस्त लावणे आणि विकासात्मक बदलांची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल. मांढरे यांनी शिक्षण विभागात बदल करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेत टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
कसे काम करणार टास्क फोर्स? : तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनामध्ये बदल करण्याची गरज, सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्यासाठी उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी विविध टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. टास्क फोर्स प्रमुखांना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामकाजाचे नियोजन करावे लागणार आहे. उद्दिष्टांची कालमर्यादेत पूर्तता झाली की नाही, याची तपासणी करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी प्रगतीचा आढावा सादर करावा लागणार आहे. यासाठी विविध प्रकारची पत्रे विकसित करण्याचे बंधनही आहे.
उल्लेखनीय कामगिरी, दुर्लक्ष अथवा दिरंगाई केल्यास त्याबाबतची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात येणार आहे. प्रथम प्राधान्य हे प्रलंबित प्रश्नांना दिले जाणार आहे. त्याचबरोबर जे कोणी दोषी अधिकारी यामध्ये आढळतील त्यांच्यावर ती कारवाई केली जाणार आहे. पट पडताळणी अनेक वर्ष झालेली नाही ती केली जाईल, हे सर्व करत असताना त्यांनी शिक्षण विभागातील कार्यालयातील दप्तरांचेही स्वतः तपासणी करायला सुरुवात केली आहे. आठवड्यातून दोन दिवस ते कार्यालयात असतील बाकी दिवस फिल्डवरती असणार असल्याचे सूरज मांढरे यांनी सांगितले.