पुणे - विद्यार्थ्यांनी राजकारणात येण्याचा भानगडीत पडू नये, या क्षेत्रात काही खरं नाही. इतर क्षेत्रांमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. मी राजकारणात आलो आणि अडकलो. इथून आता हलताही येत नाही, अन् कुठं जाताही येत नाही. पण तुम्ही तसे या क्षेत्रातील अडकू नका, असे सांगत विविध क्षेत्रात करीयर करण्याचा कानमंत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवारांच्या या मिश्कील सल्ल्याने सभागृहात यावेळी मात्र जोरदार हशा पिकला.
विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रासोबत कृषी, स्पर्धा परिक्षामध्येही विद्यार्थ्यांनी चांगले करीअर करायले हवे, मात्र, जे क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रात आपल्या पालकांसह गावाचे नाव उज्वल करण्याचा सल्ला ही अजित पवार यांनी यावेळी तरुणांना दिला.
कार्यकर्त्यांना पोट कमी करण्याचा सल्ला-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील ग्रामीण शाळातील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी विद्यार्थ्यांना सल्ला देतानाच कार्यकर्त्यांना देखील पोट कमी करण्याचाही सल्ला दिला आहे. तसेच मी रोज पहाटे 5 वाजता उठतो आणि एक तास व्यायाम करतो. त्यामुळे रोज व्यायाम करत जा आणि कार्यकर्त्यांना ढेरी कमी करा. नाहीतर लोकांना सांगताना माझी पंचायत व्हायची असा चिमटा देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना काढला आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थी कमी पडता कामा नये-
युपीएससी क्षेत्रात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, बिहार, उत्तर प्रदेश विद्यार्थ्यांची जास्त आहे, तिकडचे विद्यार्थी आय ए एस होतात, मात्र सुरुवातीला आमच्याही काही चूका झाल्यात,कारण विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आम्ही कमी पडलो, मात्र महाराष्ट्रातीव विद्यार्थी कमी पडता कामा नये असं म्हणत पवारांनी यावेळी अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रप्रेम जागवले.