पुणे - उपमुख्यमंत्री यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने सोमवार 13 जुलैपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आहे. तसेच लोकांना त्रास होईल, पण रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - 'यूजीसी गोंधळ निर्माण करतंय...कोरोनाकाळात परीक्षा घेणं चुकीचं'
काय म्हणाले अजित पवार....
- दोन दिवसांनी लॉकडाऊनला सुरुवात होईल. लॉकडाऊन कधीपर्यंत लागू असेल, याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल. लोकांना काही गोष्टी खरेदी करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.
- सारथीला छत्रपती शाहू महाराजांचं नाव आहे. त्याला साजेसे काम झाले पाहिजे. सारथीच्या कामकाजाची माहिती, सारथीकडून होणार्या खर्चाची माहिती लोकांना वेबसाईटवर वेळेच्या वेळी समजायला हवी.
- अनेक देशांमध्ये लॉकडाऊन पुन्हा लागू करावं लागले याचा अर्थ पहिले लॉकडाऊन चुकला असा होत नाही.
- कर्जमाफीतुन राहिलेल्या शेतकऱ्यांना आम्ही साडेआठ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.
- आघाडी सरकार चालवताना आम्ही जबाबदारी घेतो आहे. नजरचुकीने काही गोष्टी घडल्या तर त्या सुधारायच्या असतात, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.