पुणे -ओमायक्रॉन (Omicron in Maharashtra) महाराष्ट्रात झपाट्याने पसरत आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या महानगरांमध्ये काही दिवसातच रुग्णसंख्या 100 पटींनी वाढली. यामुळे टेस्टिंग लॅबवरचा (Corona Testing Lab) ताण प्रचंड वाढला. परिणामी रिपोर्ट येण्यासाठी दोन-तीन दिवस लागत होते. त्यानंतर आयसीएमआरने (ICMR) 10 जानेवारीला होम टेस्ट किट (Home Test Kit) किंवा सेल्फ टेस्ट (Self Test) करण्याची परवानगी दिली.
- डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले....
होम टेस्ट किट वापरून रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट रिपोर्ट फक्त 15 ते 20 मिनिटांत येतो. त्यामुळे अनेकांनी कोरोना चाचणीसाठी होम किट्सचा वापर केल्यानंतर त्याचा रिपोर्टिंग करायचे असते. राज्यात विविध शहरात हे किट मोठ्या प्रमाणात विकले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी त्याचा वापरही केला. पण फक्त 20 ते 30 टक्केच नागरिकांनी याचे रिपोर्टिंग केले आहे. त्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली नाही. त्यामुळे कोरोनाच्या आकडेवारीत मोठी गफलत होऊ लागली आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (Dr. Avinash Bhondave) यांनी दिली आहे.
- हजारो रुग्णांना ट्रॅक करणे शक्य होत नाही -
ओमायक्रॉन हा नाक आणि घशापर्यंत मर्यादित राहतो. त्याचा फुफ्फुसांपर्यंत संसर्ग फार कमी दिसत असल्याने रग्णांना सर्दी, खोकला आणि ताप अशी सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे लोक घरीच कोरोना चाचणीसाठी उपलब्ध किट्सचा वापर करून टेस्ट करत आहेत. मात्र, रिपोर्टची माहिती प्रशासनाला दिली जात नाही. ज्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या हजारो रुग्णांना ट्रॅक करणे शक्य होत नाही. कोरोना चाचणीची माहिती न दिल्यामुळे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या माध्यमातून संसर्ग इतरांमध्ये पसरू शकतो. त्यामुळे होम टेस्ट किटमध्ये टेस्ट केल्यानंतर त्याचे अॅटोमॅटिक रिपोर्टिंग व्हायला पाहिजे. नाहीतर जिथून हे किट घेण्यात आले अशा ठिकाणी याची नोंद व्हायला पाहिजे, असे देखील यावेळी डॉ. भोंडवे म्हणाले.
- चुकीच्या पद्धतीने केला जातोय वापर -
होम टेस्ट किट जेव्हा एखादा व्यक्ती घेऊन जातो, तेव्हा तो त्याच्या हिशोबाने स्वॅब घेत असतो. पण नाकाचे स्वॅब घेताना एक शास्त्रीय पद्धत आहे आणि ते त्याच पद्धतीने घेतले पाहिजे. पण अनेकांना याची कल्पना नसल्याने ते चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेतले जात असल्याने एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह असला तरी तो निगेटिव्ह दाखवला जात आहे. तर अनेक रुग्ण हे कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय होम आयसोलेशनमध्ये राहत आहेत. त्यामुळे याचा धोका अधिक असल्याचे यावेळी भोंडवे म्हणाले.