पुणे : शेतकरी आंदोलनावरून परदेशातील सेलिब्रिटींनी ट्विट केल्यानंतर देशात #IndiaAgainstPropoganda मोहिम चालविणाऱ्या सेलिब्रिटींना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आंदोलनाविषयी व्यक्त होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी बोलु नये असं तुम्हाला वाटतं, तर तुम्ही तरी यावर बोललं पाहिजे असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
मग तुम्ही तरी बोला ना
दिल्ली आंदोलनाबाबत बाहेरच्या देशातील लोकांनी बोलू नये असं मत देशातील सेलिब्रिटींनी व्यक्त केलंय. मग माझं त्यांना सांगणं आहे की, तुम्ही तर बोला. हा आपल्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे हे बरोबर आहे. पण इतके दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यावरही बोलायला हवे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
मुंडे प्रकरणावरही भाष्य
धनंजय मुंडेंच्या विरोधात पुन्हा तक्रार करण्यात आलीय. पण याआधीही जी तक्रार देण्यात आली होती, ती पुन्हा मागे घेण्यात आली. त्या महिलेच्या विरोधातच अनेकांनी तक्रारी दिल्या असे मत त्यांनी धनंजय मुंडेंविषयी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान व्यक्त केले.
शर्जीलचे शब्द चुकीचे
शर्जील उस्मानीचे शब्द चुकीचे होते. आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतो. पण याचा अर्थ कोणाच्या भावना दुखावणं होत नाही असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
हा साहित्य महामंडळाचा निर्णय
साहित्य संमेलनासाठी कोणाला बोलवायचे याचा निर्णय साहित्य महामंडळ घेईल. आम्ही त्यामधे ढवळाढवळ करणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बनवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.