मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडनुसार भाजपा महायुतीला मोठा विजय मिळताना दिसतोय. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुती 200 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीला 60 जागा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. लोकसभेच्या प्रतिनिधित्वाच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि विधानसभा संख्याबळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीचे निकाल एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्यांचे भवितव्य ठरवणार आहेत आणि राज्यातील राजकीय वातावरण बदलू शकतात. आज सकाळी ठीक आठ वाजता मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झालीय. सायंकाळपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी निकालाचे कल मान्य करण्यास नकार दिलाय. निवडणुकीच्या निकालाचे आकडे येतात. पण ही लोकशाहीमध्ये झालेली निवडणूक आहे. जनतेला हा कौल मान्य नाही. शिंदेंना 20 च्या वर जागा मिळणे शक्य नसल्याचंही संजय राऊत म्हणालेत.
150 हून अधिक जागांवर बंडखोर : खरं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलंय. विधानसभेच्या 288 जागांसाठी सर्व पक्षांचे एकूण 4136 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांपैकी 2086 अपक्ष आहेत. 150 हून अधिक जागांवर बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत, ज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढत आहेत.
एकूण 65.11 टक्के मतदान झाले: महाराष्ट्रात मुख्य लढत सत्ताधारी महायुती (भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना-यूबीटी आणि राष्ट्रवादी-शरद पवार) यांच्यात आहे. आज सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. मतदानासाठी 1,00,186 केंद्रे तयार करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात एकूण 65.11 टक्के मतदान झाले, जे 2019 च्या तुलनेत सुमारे चार टक्के जास्त आहे. सर्वाधिक मतदान कोल्हापुरात तर सर्वात कमी मुंबई शहरात झालंय.
या दिग्गजांच्या भवितव्याचा आज फैसला होणार : मतदानानंतर एक्झिट पोलच्या निकालाचे आकडेही समोर आले होते. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ज्या प्रमुख उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे, त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री जयंत पाटील, नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे यांचा समावेश आहे. निलेश राणे यांच्या नावाचा समावेश आहे.
हेही वाचा