पुणे - भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रातील काही भागात दिवाळी सुरु होते ती 'वसु-बारस' या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत -
हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची तिच्या वासरासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्सद्वादशी असेही म्हणतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.
हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस -
ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात होते. अनेक स्त्रियांचा या दिवशी उपवासही करतात. तसेच अनेक ठिकाणी आपल्या दैनंदिन जीवनात गाई-वासराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीदेखील 'वसुबारस' हा सण सुरू केला असावा, अशी मान्यता आहे.
हेही वाचा - कोणी वाहन घेत का वाहन? दिवाळीतही वाहन खरेदीला 50 टक्के ग्रहण