पुणे - माझ्यावर लॅपटॉप चोरल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर मला एकच प्रश्न पडला आणि तो म्हणजे मदत करणे गुन्हा आहे का? माझ्यावर आरोप करणारे जे कोणी आहेत त्यांनी सर्वप्रथम या संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यावी आणि त्यानंतर माझ्यावर आरोप करावेत. पूजा चव्हाणच्या मोबाईल आणि इतर काही वस्तू आहेत त्या सर्व पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते सर्व बिनबुडाचे आरोप आहेत. त्यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे धनराज घोगरे यांनी सांगितले आहे. धनराज घोगरे हे भाजपचे नगरसेवक आहेत.
ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी केवळ मदत करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी गेलो होतो. पूजा चव्हाणचा जीव वाचावा यासाठी तिला रुग्णालयात घेऊन गेलो होतो. तिचा जीव वाचावा यासाठी प्रयत्न करणे हा गुन्हा आहे का? अशी प्रतिक्रिया धनराज घोगरे यांनी दिली आहे.
पूजा चव्हाणचा मोबाईल पोलिसांकडेच?
पूजा चव्हाण चा मृत्यू झाल्यानंतर तिचा मोबाईल गायब असल्याचे सांगितले जात होते. परंतु तो मोबाईल आता पोलिसांकडेच असल्याचा खुलासा धनराज घोगरे यांनी केला. एका स्थानिक नागरिकाला हा मोबाईल सापडला होता. त्यांनी स्वतः पोलिसात जाऊन हा मोबाईल जमा केला. यासंदर्भातला लेखी जबाबही त्यांच्याकडे असल्याचे घोगरे यांनी यावेळी सांगितले.
ऑडिओ क्लिप व्हायरल कुणी केल्या याचा तपास पोलिसांनी करावा
पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी याप्रकरणी संभ्रम निर्माण करणाऱ्या बारा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिप सुद्धा धनराज घोगरे यांनीच व्हायरल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर बोलताना घोगरे म्हणाले, या ऑडिओ क्लिप कोणी आणि कशा व्हायरल केल्या याचा तपास पोलिसांनी करावा आणि यातील सत्य समोर आणावे. या प्रकरणाशी बाजा काहीएक संबंध नाही. माझ्यावर जे आरोप होत आहेत त्यावर पुढे काय करायचे याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत बोलून घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - महिला रुग्णाला शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टर बडतर्फ
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या बाबरी मशीद विद्ध्वंस समर्थनामुळे घटक पक्ष नाराज; शरद पवारांना लिहिणार पत्र