बीड - राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे आपल्या परळी येथील 'जगमित्र' कार्यालयात रविवारी परळी मतदारसंघातील जनतेला भेटले. सामान्य परळीकरांची गाऱ्हाणी, अडचणी, मागण्या, निवेदने स्वीकारत तब्बल सहा तासांपेक्षा जास्त वेळ झाला तरी रात्री उशिरापर्यंत हा जनता दरबार सुरूच होता.
सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हजारावर लोकांनी आपले निवेदन-मागण्या धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडल्या. हे सत्र रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. यावेळी परळी मतदारसंघ व परिसरातील अनेक नागरिक, महिला, विद्यार्थी आदींनी विविध विभागातील आपली प्रलंबित कामे, दफ्तर दिरंगाईचे विषय, विविध विभागातील बदली सारख्या मागण्यांचे शिफारस अर्ज, सामाजिक न्याय विभाग व अन्य विभागातील विविध मागण्यांसादर्भातील निवेदने सादर करून आपले म्हणणे मांडण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
मुंडे मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच असा जनता दरबार घेतल्याने भेटणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. ती संख्या वरचेवर वाढतच होती. आपल्या जगमित्र कार्यालयातील समोरच्या रिसेप्शन टेबलालाच खुर्ची मांडून मुंडे बसले आणि आलेल्या शेवटच्या माणसाचे समाधान होईपर्यंत बसून एक एक काम मार्गी लावणे सुरू होते.