पुणे ( बारामती ) - शरद पवारांची ( Sharad Pawar ) भूमिका कधी कुणाला कळली आहे का? ते काय भूमिका घेतात. हे त्यांनाच माहिती असतं, त्यामुळे त्यावर भाष्य न केलेलेच बरे. असा सावध पवित्रा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आज इंदापूर दौऱ्यावर ( Devendra Fadnavis In Indapur ) होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
म्हणून ओबीसी आरक्षण गेले - ओबीसी आरक्षण संदर्भात बोलताना फडणवीस यांनी नाना पटोले यांना स्मृतीभ्रंश झाला आहे, अशी टीका केली. तसेच भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात 50 टक्क्यांहून अधिक ओबीसी आरक्षण टिकविण्याचे काम आम्ही केले. मात्र, सध्याच्या ठाकरे सरकारच्या काळात आरक्षणाची पूर्तता न झाल्याने ओबीसी आरक्षण गेले. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पहिली जागा संभाजी राजेंना सोडावी - भाजपाने संभाजी राजेंना सहा वर्ष राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले. पक्षाने त्यांना कधी भाजप पक्षाचा प्रचार करा, असे सांगितले नाही. छत्रपती घराण्याविषयी आम्ही निष्ठा दाखवली. आता शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वाटेतील पहिली जागा संभाजी राजेंना सोडावी, असेही फडणवीस म्हणाले.
राऊत महत्त्वाचे व्यक्ती नाहीत - संजय राऊत हे कोणी महत्त्वाचे व्यक्ती नाहीत. ते सकाळी एक व संध्याकाळी वेगळ बोलतात. अशा व्यक्तीला आम्ही खूप महत्त्व देत नाहीत. अशा शब्दात फडणवीसांनी राऊत यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर दिले. तसेच राज ठाकरे किंवा कोणताही राम भक्त उत्तर प्रदेशमध्ये जाईल. त्यांचे भाजपच्यावतीने स्वागतच करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.