पुणे - कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे बंद होती. परंतु आता कोरोनाचे संकट नियंत्रणात येत असल्यामुळे, राज्यसरकारने हळूहळू धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. असे असताना पुण्यातील शनिवारवाडा मात्र अजूनही बंदच आहे. हा शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे. येत्या दोन दिवसात शनिवारवाडा उघडला नाही, तर तो आम्ही उघडू असा इशारा ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी दिला आहे.
मंदिरे उघडली शनिवारवाडा का नाही?
आनंद दवे म्हणाले लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक स्थळे उघडण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली. महाराष्ट्र सरकारनेही ऐतिहासिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली. परंतु पुरातत्व खात्याला मात्र अजूनही जाग आलेली दिसत नाही. पुण्यातील शनिवारवाडा अजूनही बंद आहे. दिवाळीनिमित्त किंवा इतर काही कारणासाठी बाहेरगावचे लोक पुण्यात आल्यानंतर त्यांना शनिवारवाडा पाहण्याची इच्छा असते. परंतु तो बंद असल्यामुळे त्यांना पाहता येत नाही. हा पुणेकरांचा अपमान आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे शनिवारवाडा ताबडतोब पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात आम्ही पुरातत्व खात्याला निवेदन देणार आहोत. त्यानंतर पुढच्या दोन दिवसात पुरातत्व खात्याने शनिवारवाडा उघडला नाही, तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन पर्यटकांसाठी शनिवारवाडा खुला करू असा इशारा आनंद दवे यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - आ. भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागावी - निलेश राणे
हेही वाचा - अमेरिकेत ‘हायपरलूप’ची पहिली मानवी चाचणी यशस्वी; पुण्याच्या तनय मांजरेकरला प्रवासाची संधी