पुणे - महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यावर बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले, बेरजेचे राजकारण करायचे असते, इलेक्टिव्ह मेरिट बघायचे असते, लोक निवडून आणायची असतात. निवडून आल्यानंतरच सरकारमध्ये काम करता येतं नाहीतर नुसतेच विरोधी पक्षात बसून ओरडावे लागते.
अजित पवार पुढे म्हणाले की, पक्ष बदलणाऱ्यांना पक्ष, ध्येय, धोरण, निष्ठा याच्याशी काही देणेघेणे नसते. पण आपल्या प्रभागातील कामे व्हावीत असेही काहींना वाटत असेल, त्यामुळे सत्ताधारी पक्षात जाऊन निवडून आल्यानंतर कामे मार्गी लागतील असे नेत्यांना वाटत असते. त्यामुळे याआधी नरेंद्र मोदींचा झंझावात असल्यामुळे अनेकजण त्यांच्या पक्षात गेली. पण आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आपल्या वॉर्डाचा विकास व्हावा अशी इच्छा बाळगणारे आता वेगळा विचार करतील.
धनंजय मुंडेंवर प्रतिक्रिया
राजकारणात काम करत असताना लोकांच्या मनात नाव निर्माण करण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी अनेक दिवस जातात. पण कुणी काही आरोप केले की त्यांचे नाव एका दिवसात खराब होते. विरोधी पक्षही हा मुद्दा उचलून धरतात. धनंजय मुंडे यांच्या बाबतीतही तेच होतेय, ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्या विरुद्ध वक्तव्य केलं त्याला जबाबदार कोण? बहुजन समाजतून पुढे आलेला एक सहकारी, तो बदनाम होतो, त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं त्याला वाली कोण? असा प्रश्न अजित पवारांनी केला. आम्ही पाठीशी घालतोय असे आरोप झाले, पण संपूर्ण तपास होऊ द्या सत्य बाहेर येऊ द्या म्हणत होतो. पण धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली असल्याचे अजित पवार म्हणाले.
कोरोना लसीकरणाबाबत सध्या अनेक अडचणी
कोरोना लसीकरणाबाबत सध्या अनेक अडचणी आहेत. ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे. 60 ते 65 टक्के लसीकरण झालं. मात्र शहरात 25 ते 30 टक्केच लोकांनी लस घेतली. लोकं ऐनवेळी निर्णय बदलतात. लस घेण्यास नकार देतात. कोविन अॅपची समस्या आहे्, अशी कारणे आहेत. खासगी डॉक्टर्सना पण लस द्यावी अशी मागणी आहे. त्याबाबत निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले. तुम्ही लस घेणार का? अशी विचारणा केल्यावर अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींना जेव्हा लस घेण्याची परवानगी मिळेल तेव्हा आम्ही लस घेऊ.
हेही वाचा - दिलासा! धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे