पुणे - 'ज्ञानवापीप्रमाणे पुण्यात देखील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ( Punyeshwar and Narayaneshwar temples ) या दोन मंदिराच्या जागी दर्गा बांधण्यात आले आहेत. काशीतील ज्ञानव्यापी मशिदीच्याप्रमाणे पुण्यातील 'या' दोन मंदिरांच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत. या दर्ग्याच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी यापुढच्या काळात लढा उभा केला जाईल,' असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुण्यात देखील मंदिर आणि दर्ग्याचा वाद पेटणार आहे. काल पुण्यातील राज ठाकरे यांच्या सभेत मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे ही भूमिका मांडली.
दर्गा परिसरात औरंगजेबाच्या नातवाची कबर - शिंदे यांनी आपल्या भाषणात पुण्यातील या दोन ऐतिहासिक मंदिरांची माहिती दिली. ते म्हणाले, आधी अल्लाउद्दीन खिल्जी व नंतच्या काळात औरंगजेबाने या या दोन्ही मंदिरांचा नाश केला व त्या ठिकाणी दर्गा बांधण्यात आल्या. कसबा पेठेत कुंभारवाड्यात असलेल्या पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर सध्या छोटा शेख नावाने दर्गा बांधण्यात आला आहे. या दर्गा परिसरात औरंगजेबाच्या नातवाची कबरदेखील आहे. असे देखील यावेळी शिंदे यांनी सांगितले.
केंद्र सरकारचे पुरातत्व खाते तसेच पुणे महापालिकेकडे पाठपुरावा सुरू - दुसरी दर्गा शनिवारवाड्यासमोर असून याठिकाणी मंदिर पाडून दर्गा बांधण्यात आली आहे. कुंभारवाड्यातील मंदिराच्या जागेवर बांधण्यात आलेल्या मशिदीला छोटा शेख तर नारायणेश्वराच्या जागेवर बांधण्यात आलेल्या मशिदीला बडा शेख दर्गा असे नाव देण्यात आले आहे. प्राचीन पुण्यात कसब्याच्या परिसरात तीन मंदिरे होती. तिसरे नागेश्वर मंदिर सोमवार पेठेत असून सुदैवाने इतिहासात त्यावर कोणतेही आक्रमण झालेले नाही. दोन्ही मंदिरांच्या मुक्तीसाठी खूप आधीपासून आपण काम करीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणात राज्य व केंद्र सरकारचे पुरातत्व खाते तसेच पुणे महापालिकेकडे पाठपुरावा सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
न्यायालयीन मार्गाने लढा उभा करणार - या प्रकरणी हिंदू महासंघाने देखील आपली भूमिका जाहीर केली आहे की, आम्ही या दोन्ही मंदिरांसाठी याचिका दाखल करणार आहोत आणि आमचा न्यायालयावर विश्वास असून आम्ही न्यायालयीन मार्गाने हा लढा उभा करणार आहोत, असे यावेळी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आंनद दवे यांनी म्हटले आहे.
बोलण्यास स्थानिकांचा नकार - या प्रकरणी पुण्येश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या छोटे शेख दर्गा येथे माहिती घेण्याचा प्रयत्न केला, असता हा संपूर्ण प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने येथील स्थानिकांनी बोलण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा - Raj Thackeray : ज्ञानवापीवरील लक्ष विचलित न होण्याकरिता राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द?