पुणे - शहर आणि जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आला; यामध्ये अरण्येश्वर भागातील आसरा गोशाळेतील तब्बल 35 गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. संबंधित गोशाळा औरंगे कुटुंबीयांची असून, अचानक ओढावलेल्या या संकटामुळे हे कुटुंब हवालदिल झाले आहे. दुभत्या गाई डोळ्यासमोर वाहून गेल्याचे पाहताना कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
शहरात बुधवारी रात्री आठ नंतर पावसाचा जोर वाढला आणि औरंगे यांच्या गोशाळे जवळील लक्ष्मी नगर नाल्याला मोठा पूर आला. काही कळायच्या आतच पाणी गोशाळेत भरलं.
या परिस्थितीत औरंगे कुटुंबीयांनी गाईंना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला, परंतु, काही वेळातच संपूर्ण गोठा जलमय झाला. स्थानिक काही गाईंना वाचवू शकले; परंतु, तोपर्यंत ५५ पैकी ३५ गाई वाहून गेल्या होत्या.