पुणे - शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका परप्रांतीय इसमाचा मृत्यू झाला, यावेळी पोलीस स्टेशनमध्ये हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सदर व्यक्तीचा मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवून दिला. शवविच्छेदन झाले मात्र मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यास कोणीच नाव्हते. मात्र, यावेळी घरच्यांनी अंत्यविधी नाकारला असताना पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी सदर व्यक्तीच्या मृतदेहाला अग्नी देत अंत्यविधी केल्याने खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन शिक्रापुरात घडले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बुधवारी घडलेल्या एका घटनेत चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. यावेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार दत्तात्रय बनकर व मदतनीस पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे पाठवून देत मृत इसमाच्या नातेवाइकांशी फोनवर संपर्क साधत सर्व माहिती दिली. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी वैजनाथ काशीद यांनी, या मृतदेहाचे शवविच्छेदन करून दिले. मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच हजर नव्हते. यावेळी पोलीस शिपाई अंबादास थोरे यांच्या समोर आगळावेगळा प्रश्न उभा राहिला, त्यामुळे त्यांनी सदर मृत व्यक्तीच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता त्यांनी साहेब आम्ही दुसऱ्या राज्यात आहे. सध्या कोरोनाच्याकाळात तिकडे येण्याच्या मोठ्या अडचणी तुम्हीच आमचा मुलगा आहात या हेतूने तुम्ही तिकडे अंत्यविधी करा आम्हाला व्हिडीओ कॉल करून आमच्या माणसाने अंतिम दर्शन द्या अशी विनंती केली. यावेळी अंबादास थोरे यांनी देखील क्षणाचा विचार न करता याला होकार देत सदर मृत व्यक्तीचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांच्याशी संपर्क साधून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सदर व्यक्तीचे शिक्रापूर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायकवाड, बबलू शेख, पप्पू चव्हाण, सिकंदर शेख यांचे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी सांगितले. मात्र, पोलीस शिपायाकडून घडलेल्या अनोख्या प्रकारातून खाकीतील माणुसकीचे दर्शन घडले आहे.