पुणे - कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी खाटांच्या उपलब्धतेची माहिती मिळावी यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने कॉल सेंटरचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. आता कॉल सेंटरवर कोरोना संदर्भातील माहिती 24 तास मिळणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
कोरोनाग्रस्तांना खाटा उपलब्ध होणे सोपे व्हावे या अनुषंगाने कोरोना कॉल सेंटरचा आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या भेटीवेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आता 10 हेल्पलाईन सेंटर
कोरोना कॉल सेंटर आता 24 तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. यापूर्वी 5 हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध होते. ते आता दहापर्यंत वाढवण्यात येत आहेत. त्यामुळे कॉल कनेक्ट होण्यास अडचण निर्माण होणार नाही, असेही मोहोळ म्हणाले.
पुणे महानगरपालिका तयार करणार पाच हजार सीसीसी खाटा
पुणे शहरातील कोरोनाची एकूण स्थिती पाहता खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर खाटांची उपलब्धता आणि भविष्यातील आयसीयू (अतिदक्षता विभाग) आणि व्हेंटिलेटर खाटांची गरज पाहता सुमारे सात हजार खाटा कोविडसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवाय महापालिकेने सीसीसीचे पाच हजार बेड्स तयार करण्याचे नियोजन केले असून त्यापैकी 1 हजार 250 खाटा उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय 1 हजार 450 खाटांची तयारी सुरू आहे. डॅश बोर्ड अद्ययावत ठेवणे आणि गरजूंना कमीत कमी वेळेत खाट उपलब्ध करुन देण्याबाबतही प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असेही यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
हेही वाचा - पुण्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाट वाढवण्याची गरज