पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. त्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडून प्रचारासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरल्या जात आहेत.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या कार्यकर्त्यांचा दुचाकीवरून स्पीकरने प्रचार केला जात आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत कमी वेळात पोहोचून प्रचार करण्यासाठी या दुचाकीचा वापर करण्यात येत आहे.
काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यातून आलेले तरुण पाठिवर मोबाईल होर्डिंग लावून शहरात सगळीकडे प्रचार करत आहेत. तसेच टेम्पोचाही वापर केला जात आहे. रिक्षांवरील भोंग्यांना अधिक खर्च येतो. कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या वाहनांचा आणि साधनांचा वापर दोन्ही राजकीय पक्ष करत आहेत.