पुणे - केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रातील अपयशाचा निषेध करत काँग्रेसकडून शुक्रवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. बेरोजगारी वाढली आहे आणि उद्योगधंदे बंद पडत आहेत. मंदीमुळे अनेकांचे रोजगार जात आहेत. अतिवृष्टीने शेतकरी बरबाद झाला आहे. देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, असा आरोप करत काँग्रेसने सरकारविरोधी घोषणा देत आंदोलन केले.
हेही वाचा - पिंपरीत एक्स-रे मशीनच्या स्फोटात एक वर्षीय चिमुकली जखमी, डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल
पुण्यातील फडके हाऊस चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत हे आंदोलन करण्यात आले. या वेळी सरकारच्या विरोधात पोस्टर फलक हातात घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली असताना दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पंधरा दिवस होऊन अद्यापही सरकार स्थापन केले जात नाही.
हेही वाचा - मॉडर्न पुणे: घरकाम करणाऱ्या गीता मावशी व्हीझीटिंग कार्डमुळे सोशल मीडियावर व्हायरल
राज्यात शेतकरी मरत असताना यांना 50-50 चा फॉर्म्युला महत्त्वाचा वाटतो, हे कशासाठी आहे, हे जनतेला कळून चुकले असून बहुमत मिळून देखील यांना सत्ता स्थापन करता येत नाही. सामान्य जनतेकडे यांचे लक्ष नाही, असा आरोप यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच शहर पदाधिकारी उपस्थित होते.