पुणे - आर्थिक वादातून पतीचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण झाल्याची तक्रार एका महिलेने दीड महिन्यांपूर्वी बिबेवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्या एका साठ वर्षीय व्यक्तीला अटकही केली होती. याच व्यक्तीने खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतु अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोधच लागत नसल्यामुळे दीड महिन्यानंतरही या प्रकरणाचे गूढ वाढतच आहे.
निवृत्त लष्करी सुभेदार महादेव वाबळे (वय 60) यांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तर शिवशंकर नरसिंग पाटोळे (वय 33) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम 364 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या व्यक्तीची पत्नी संजिवनी शिवशंकर पाटोळे (वय 24) यांनी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला या पतीसह अप्पर इंदिरानगर परिसरात राहतात. त्यांचे पती शिवशंकर पाटोळे हे जानेवारी महिन्यापासून बेपत्ता झाले आहेत. सुरुवातीला त्यांनी नातेवाईकांकडे आणि मित्रांकडे चौकशी केली. परंतु शिवशंकर हे सापडले नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात मिसिंग असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेत शिवशंकर पाटोळे यांचा शोध सुरू केला परंतु ते काही सापडले नाहीत.
शिवशंकर यांचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण झाल्याची तक्रार-
दरम्यान शोधाशोध करूनही शिवशंकर पाटोळे यांचा पत्ता लागत नसल्यामुळे त्यांच्या पत्नीने शिवशंकर यांचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण झाले असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असता एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी महादेव वाबळे आणि शिवशंकर पाटोळे एका गाडीने जात असल्याचे दिसले. पोलिसांनी महादेव वाबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने शिवशंकर सोबत आपली भेटच झाली नसल्याचे सांगितले.
पोलिसांना वाबळे यांच्यावर संशय-
वाबळे आणि पाटोळे सीसीटीव्हीमध्ये एकत्र दिसल्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर वाबळेने मी गावी जात असताना तो माझ्या गाडीत बसला होता. परंतु त्याच्या जवळ बंदूक असल्यामुळे मी त्याला इंदापूर जवळच गाडीतून खाली उतरवले, असे सांगितले. पोलिसांना वाबळे यांच्यावर संशय असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत दोन वेळा त्यांची पोलीस कोठडी घेतली. परंतु अद्यापही या प्रकरणात काहीही निष्पन्न झाले नाही.
काही दिवसांपूर्वी दोन मृतदेह सापडले-
अनेकदा तपास केल्यानंतर शिवशंकर याचा कुठेही पत्ता लागला नाही. अथवा त्याचा मृतदेहही सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता शहरात बेवारस अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. वाबळे आणि पाटोळे गेलेल्या सोलापूर रस्त्यावर काही दिवसांपूर्वी दोन मृतदेह सापडले आहेत. या दोन्ही मृतदेहांचे डीएनए तपासले जाणार आहेत. बिबवेवाडी पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या उद्देशाने अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
हेही वाचा- भिवंडीत कोविडची दुसरी लस घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू ?