पुणे - गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलसह आता सीएनजीच्या किंमतीत देखील वाढ होऊ लागली आहे. आज सीएनजीच्या दरात तब्बल 2 रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी आता 75 रुपये प्रति किलो एवढे झाले आहे. महिन्याभरात 15 ते 18 रुपयाची वाढ सीएनजीत झाली आहे.
पेट्रोल डिझेलच्या किमती भिडल्या गगणाला - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरोरोज वाढ होत आहे. आज पेट्रोल 120 तर डिझेल 102 रुपये लिटर झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. आता तर सीएनजीच्या दरात देखील वाढ होत असल्याने अजूनच याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.
रिक्षा दरवाढ होण्याची पुणेकरांना भीती - रोजच्या इंधन दरवाढीमुळे सध्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसत आहे. सीएनजीत राज्य सरकारकडून वॅट कमी करण्यात आला होता. यामुळे कुठे थोडा दिलासा मिळाला होता. पण लगेच काही दिवसांनी पुन्हा वाढ झाल्याने याचा फटका नागरिकांना बसत आहे. एकीकडे पेट्रोल डिझेल वाढ तर दुसरीकडे सीएनजीत वाढ झाल्याने रिक्षा दरवाढ होणार की काय असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे.