पुणे - शहर आणि जिल्ह्यातील विस्थापित, कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्ती यांना ज्या राज्यात आणि जिल्ह्यात जाणार आहे, तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी आणि वैद्यकीय तपासणीनंतरच जाण्याचा पास मिळणार आहे. पुणे जिल्हयातून अन्य राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्हयामध्ये जाणारे मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांनी covid19.mhpolice.in या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांचे हद्दीतील अर्जावर संबंधित आयुक्तालयातील नोडल अधिकारी पोलीस उपआयुक्त हे निर्णय घेतील. असा निर्णय घेताना मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांची यादी पोलीस उपआयुक्त, जिल्हाधिकारी, यांच्यामार्फत ते ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाणार आहेत. तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी प्राप्त करुन घेतील व त्यानंतरच पास देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
हेही वाचा.... असाही एक विवाह.. वडील कर्तव्यावर; निवृत्त कर्नलच्या मुलीचे पुणे पोलिसांनी केले कन्यादान
महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार विस्थापित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांचे प्रवासाकरीता आदेश निगर्मित केले आहेत. या आदेशानुसार सदर व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करण्यात आल्याची तसेच याकरीता नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील इतर जिल्हयात व इतर राज्यांमध्ये जाणा-या मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांची यादी संबंधित तहसिलदार करतील. ते ज्या जिल्ह्यांमध्ये जाणार असतील तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी जिल्हाधिकारी पुणे यांचेमार्फत घेतील. जोपर्यंत मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांना ते ज्या जिल्हयात जाणार आहेत तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्यांना पास दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांनी कोणत्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांचे कोरोना विषाणूचे कोणतेही लक्षणे नसल्याबाबतचे प्रमाणपत्र घेवून लिंकवर अपलोड करणे अनिवार्य आहे. नागरिकांना लिंकवर माहिती भरण्यामध्ये काही अडचणी असतील तर त्यांनी ग्रामीण भागासाठी दूरध्वनी अथवा ई-मेल द्वारे संपर्क साधावा.
नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे ( दूरध्वनी क्रमांक 020-26111061 / 26123371) यांच्याकडे स्थलांतरीत कामगार ( परराज्यात, जिल्हयात जाणारे) , उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.3 श्रीमंत पाटोळे ( दूरध्वनी क्रमांक 020-26111061/26123371) यांच्याकडे स्थलांतरीत कामगार (परराज्यात, जिल्हयात येणारे), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.26 निता सावंत-शिंदे ( दूरध्वनी क्रमांक 020-26111061/26123371) यांच्याकडे विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक ( परराज्यात, जिल्हयात जाणारे ), उपजिल्हाधिकारी, स्वागत शाखा, अमृत नाटेकर (दूरध्वनी क्रमांक 020-26111061/26123371) यांच्याकडे विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक ( परराज्यात / जिल्हयात येणारे ) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.