पुणे - बालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुणे पोलिसांकडून(Pune Police) सिंहगड, कोथरूड, अलंकार, वारजे, उत्तमनगर, दत्तवाडी या पोलीस ठाण्यांत बालस्नेही कक्षाची स्थापना(Child Friendly Police Station in Pune) करण्यात आली. आज पोलीस आयुक्त अमिताम गुप्ता(Pune CP Gupta) यांच्या हस्ते सहा पोलीस ठाण्यांमधील बालस्नेही कक्षांचे उद्घाटन करण्यात आले.
- चाइल्ड फ्रेंडली पोलीस ठाण्याचा पुणे पॅटर्न -
लष्कर पोलीस ठाण्यातील चाइल्ड फ्रेंडली पोलीस ठाण्याच्या (बालस्नेही कक्ष) यशस्वी प्रयोगानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांत चाइल्ड फ्रेंडली पोलीस ठाण्याचा पुणे पॅटर्न राबवला जात आहे. पुणे पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले असून, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी सहा पोलीस ठाणे चाइल्ड फ्रेंडली केली आहेत.
- ही ठाणी झालीत चाइल्ड फ्रेंडली -
यापूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाकर, विश्रांतवाडी, शिवाजीनगर पोलीस ठाण्याला चाइल्ड फ्रेंडली करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. पिंपरी पोलीस आयुक्तालयातील निगडी पोलीस ठाणेही पुणे पोलिसांच्या धर्तीवर चाइल्ड फ्रेंडली करण्यात आले आहे. आता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ ३ मधील सहा पोलीस ठाणे चाइल्ड फ्रेंडली करण्यात आली आहेत. यामध्ये अलंकार, सिंहगड रोड, कोथरूड, वारजे माळवाडी, उत्तमनगर, दत्तवाडी या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
- चाइल्ड फ्रेंडली पोलीस ठाणी म्हणजे काय?
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमाच्या प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार बालकांसोबत काम करणाऱ्या सर्वच यंत्रणा बालस्नेही असणे गरजेचे आहे. पोलीस ठाण्यांत आलेल्यांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती राहू नये, त्यांनी मनमोकळेपणाने पोलिसांशी बोलावे, पोलिसांचा आधार वाटावा, यासाठी 'भरोसा सेल' व 'होप फॉर दो चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने चाइल्ड फ्रेंडली पोलीस ठाण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
बालस्नेही कक्षात मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी आहेत. त्यांना तक्रार किंवा समस्या मांडताना फारशी अडचण जाणवणार नाही. कक्षातील भिंतींवर कार्टुन्स असणार आहे. मुलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तेथे समुपदेशक असणार आहेत. कक्षात मुलांसाठी पुस्तके ठेवण्यात येणार आहेत, असे परिमंडळ तीनच्या पोलीस उपायु्क्त पौर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.