पुणे - पुण्याच्या धनकवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यात एका 42 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या आईला औषधांचा ओव्हरडोस देत आईचा चेहरा प्लास्टिक पिशवीत घालून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
गणेश मनोहर फरताडे (42) आणि त्यांची आई निर्मला मनोहर फरताडे (वय 76, दोघे रा. अक्षय गार्डन सोसायटी, धनकवडी) असे मृत्युमूखी पडलेल्या दोघांची नावे आहे. याप्रकरणी गणेशच्या मावस भावाने तक्रार दिली असून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत गणेश फरताडे पुण्यातील धनकवडी येथील अक्षय गार्डन सोसायटीमध्ये आपल्या आईसह राहत होता. काही दिवसांपूर्वीच अपली नोकरी गेल्याने गणेश बेरोजगार होता. तसेच त्याने इतरांकडून मोठ्या प्रमाणात कर्जही घेतले होते. त्यामुळे लोकांनी त्याच्याकडे कर्ज परत फेडण्यासाठी तगादा लागला होता. या साऱ्या अडचणींमुळे त्याने हा मार्ग पत्करला, असे त्यांच्या जवळच्यांनी सांगितले. त्याने आधी आईला औषधांचा ओव्हरडोस दिला नंतर त्या बेशुद्ध पडल्यावर प्लास्टिक पिशवी गळ्यात घालून दोरीने घट्ट बांधून त्यांचा खून केला. त्यानंतर घराच्या छतावर जाऊन त्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक मुलाणी अधिक तपास करीत आहेत.