पुणे - लोकशाहीत निदर्शने करायची नाहीत का, सामनामध्ये तुम्ही काहीही लिहिता, त्याला काही आधार नसतो. तसेच शिवसेना भवन येथे निदर्शने करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या हातात दगडगोटे नव्हते, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत त्याला आमचा पाठींबा आहे, असे पाटील यावेळी म्हणाले. गुरुवारी पुण्यात वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित मुलींना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य -
मराठा समाजातील आरक्षण देण्यासाठी जे जे लढतायत मग ते उदयनराजे असतील, संभाजीराजे, नरेंद्र पाटील असतील या सर्वांना आमचा पाठींबा आहे, असे सांगत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. मराठा समाजातील उमेदवारांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. तसेच आरक्षणावर रिव्ह्यु पिटीशन लवकरात लवकर दाखल करावी. सोबतच मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी लागणारी अतिरिक्त फी सरकारने भरावी. मराठा समाजाला आरक्षण देणे आणि ओबीसी आरक्षण हे प्रश्न सोडवण्यासाठी एकाच मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी, अशा अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केल्या.
काळी बाजू माहीत नसते-
प्रदीप शर्मा यांना झालेल्या अटकेबाबत बोलताना, कोणी कोणासोबत निवडणूक लढवली आणि पुढं तो कोणत्या गुन्ह्यात सापडला तर त्यासाठी त्या पक्षाला दोष देण्यात अर्थ नसतो. त्या माणसाची काळी बॅग्राऊंड तो त्या पक्षात येतो तेव्हा माहिती असतेच असे नाही, असे सांगत पाटील यांनी शिवसेनेवर या मुद्द्यावरून टीका करणे टाळले.
राजकारणात विषय संपत नाही-
भाजप शिवसेनेच्या संबंधावर भाष्य करताना, एखाद्या कुटुंबात नवरा- बायको रात्री भांडतात आणि सकाळी एकत्र चहा पिताना दिसतात, तसे राजकारणातही एखादा विषय लगेच संपत नाही, असे सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.