पुणे - आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही, असे वक्तव्य करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला चिंमटे काढले आहेत. वाघाशी मैत्री होत नसते या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना पाटील यांनी चांगलीच टोलेबाजी केली.
हेही वाचा - कोरोना महामारीचे संकट पाहता पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा
- संजय राऊत यांच्यावर टीका -
वाढदिवसानिमित्त मला मनाविरुद्ध का होईना संजय राऊत यांनी शुभेच्छा देत गोड म्हटले आहे, कारण मनातून गोड असतो तर दर आठवड्याला सामनातून माझ्यावर एक अग्रलेख असतो तो लिहिला गेला नसता, असा टोला लगावत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना उत्तर दिले आहे.
- पिंजऱ्यातला वाघ -
वाघाशी तर आमची दोस्ती आहेच आणि आम्ही दोस्ती करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. मात्र, आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी आम्ही दोस्ती करत नाही आणि वाघ जोपर्यत जंगलात होता तोपर्यत दोस्ती होती. मात्र, आमची पिंजऱ्यातल्या वाघाशी दोस्ती नाही असा चिमटा पाटील यांनी यावेळी काढला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात लसीकरणाच्या ठिकाणी जाणे शक्य नसलेल्या नागरिकांना घरी जाऊन लस देण्याचा उपक्रम या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी सुरू केला, त्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले.
- स्वबळावर निवडून येऊ -
राज्यात महाविकास आघाडीवर टीका करत, वेगवेगळे लढा कोण नंबर वन ते कळेल, असे पाटील म्हणाले, अजूनही माझे आव्हान आहे, वेगवेगळे लढा कोणता पक्ष मोठा हे स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील निवडणुका स्वबळावर जिंकू हा माझा वाढदिवसाचा संकल्प आहे असे सांगत, मुंबई महापालिकेत 20 वर्षे सेनेचे राज्य आहे. राज्यात दीड वर्ष सत्ता आहे. 40 हजार कोटींचे बजेट असतं. परंतु कामं होत नाहीत. येणाऱ्या निवडणुकात लोक जागा दाखवतील, आमचे संघटन मजबूत तयार केले आहे, वाढदिवसानिमित्त मजबूत संघटन करण्याचा आणि स्वबळावर निवडणुका जिकण्याचा निर्धार असल्याचे पाटील म्हणाले .
- अजित पवारांना राऊतांचा गुण लागला -
तसेच यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. अजित पवार यांना संजय राऊत यांचा वाण नाही पण गुण लागला, असा चिमटा पाटील यांनी काढला आहे.
हेही वाचा - कोरोना लशींसह औषधावरील जीएसटी दराबाबत १२ जूनला जीएसटी परिषदेची बैठक