पुणे - भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गुपचूप आलेल्या अजित पवारांवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता असून ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात असं वक्तव्य त्यांनी केले. पुण्यात आज ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठलाही नेता धुतल्या तांदळासारखा होतो का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'असं काहीही नाही. नारायण राणेंवर कारवाई करायची की नाही, हे आता राज्य सरकारवर अवलंबून आहे. त्यांना वाटलं तर ते कधीही कारवाई करू शकतात. आणि अजित पवार यांच्यावरील कारवाईची प्रक्रियाही सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यासाठीची अंतिम प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये अजित पवारांचे देखील नाव आहे.'
हेही वाचा : भाजपमध्ये गेलेले सगळे हरिश्चंद्र झालेत; पहा संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले
दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला गृहमंत्रीपद न देण्याचा सल्ला मी उद्धव ठाकरेंना दिला होता, असेही सांगितले. त्यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी घेतला तेव्हा असाच सल्ला देवेंद्र फडणवीस यांना दिला होता का, अशी विचारणा केली असता चंद्रकांत पाटील म्हणाले, 'त्याची काहीही गरज नव्हती, कारण देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता आहेत. ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. उद्धव ठाकरे सारखे ते करत नाहीत.' उद्धव ठाकरेंना राज्यात काय चाललंय याचीच माहिती नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. ते म्हणाले, 'राज्यात काय चाललंय त्याची त्यांना माहिती नसते. देवेंद्र फडणवीसांच्या वयावर जाऊ नका. शिवसेनेने त्रास दिल्यानंतर ही महाराष्ट्रात सलग पाच वर्ष मुख्यमंत्री खूप वर्षानंतर राहिला आहे. तेव्हा देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र यावी यासाठी खूप प्रयत्न झाले होते. पण देवेंद्र फडणवीस या सर्वांना पुरून उरले होते.'