पुणे - वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय स्तरावरील टीम पुण्यात आली. या टीमने कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाण या अनुषंगाने माहिती जाणून घेतली.
या चमूतील केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सह सल्लागार डॉ. पवनकुमार सिंग, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे उपसचिव डॉ. आशीष गवई,आरोग्य सेवेचे अतिरिक्त महासंचालक पी.के.सेन हे उपस्थित होते.
बाधित रुग्णांच्याबाबतीत मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. या मागील वस्तुस्थिती केंद्रीय चमूने जाणून घेतली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. विभागात पुणे शहरात प्रमाण अधिक आहे. एकतर येथील लोकसंख्या आणि झोपडपट्टीचे कारण असले तरी ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये ५५ ते ७० वयोगटातील संख्या अधिक आहे. शिवाय बहुतांशी लोकांना उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असले तरी प्रशासनाने अगदी सुरुवातीपासूनच खबरदारी व दक्षता घेतली आहे. जिल्हा, मनपा, आरोग्य व पोलीस प्रशासन हे संयुक्तपणे हातात हात घालून काम करत आहेत, अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, पुणे महापालिका पिंपरी चिचवड महापालिका, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाला माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय पथकाने, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच अन्नधान्याचे वितरण व्यवस्थित करावे आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा, अशा सूचना दिल्या.